Nashik Railway Accident : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही अंतरावर सोमवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. दोन लोकल ट्रेन अगदी जवळून एकमेकांच्या समांतर धावत असताना, त्यांच्या दरवाजांजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना एकमेकांना धक्का लागला. त्यामुळे काही प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळले. यानंतर नाशिकमध्ये देखील रेल्वे स्थानकावर अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नाशिकरोड स्थानकावर एक प्रवासी गाडी पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. हरिद्वार एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करत असताना प्लॅटफॉर्मवर चढत असताना त्याचा हात सटकला आणि तो खाली कोसळला. अपघातानंतर स्थानकावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी प्रवाशाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. रेल्वे प्रशासन अधिक तपास करत आहे.

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु

याबाबत रेल्वेचे अधिकारी सुनील अहिरे यांनी सांगितले की, गाडी चालत असताना प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा हात सटकला आणि तो अडकला. आम्ही प्रसंग बघितल्यानंतर रेल्वेची चेन ओढत प्रवाशाला बाहेर काढले. हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

मुंबई रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू

मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. लोकलमधील काही प्रवासी अप आणि डाऊन ट्रॅकवरील गाड्यांदरम्यान असलेल्या फूटओव्हरवरून प्रवास करत होते. एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने तर दुसरी कसाराच्या दिशेने जात होती. दोन्ही लोकल अगदी जवळून जात असताना, दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या. यामुळे धक्का लागून काही प्रवासी थेट ट्रॅकवर पडले. ही दुर्घटना सकाळी 9.30 वाजता घडली. घटनेनंतर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. तर 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा 

Mumbai Local Train Accident: मित्र ट्रेनमधून पडला, एक प्रवासी उडत आला अन् तीन जणांना घेऊन गेला; लोकलमधील प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा भयावह घटनाक्रम