Nashik Politics : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल (Sunil Bagul) व महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे समजताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची हकालपट्टी केली. तर महानगरप्रमुखपदी माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांचे सुपुत्र प्रथमेश गिते (Prathmesh Gite) यांची नियुक्ती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
आगामी मनपा निवडणुकीसाठी तयारी सुरू असतानाच माजी नगरसेवक पक्ष सोडत असल्याने ठाकरे गटाची स्थिती नाजूक बनली आहे. 2017 साली झालेल्या मनपा निवडणुकीत ठाकरे गटाचे पक्षीय बलाबल 35 होते. पण, त्यातील अवघे चारच माजी नगरसेवक आता ठाकरे गटात उरले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला नवे चेहरे घेऊनच मैदानात उतरावे लागणार आहे. पक्षाची गळती काही केल्या थांबत नसल्याने करायचे काय? या अवस्थेत पदाधिकारी आहेत. प्रमुख पदाधिकारीच पक्ष सोडून जात असल्याने पक्षसंघटन मजबूत करण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे आहे.
त्यातच प्रभागनिहाय बैठकांसह पक्षाच्या इतर बैठकांना उपस्थित राहणारे सुनील बागूल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे चारच दिवसांपूर्वी मामा राजवाडे यांना शिवसेना ठाकरे गटाने महानगरप्रमुख पद दिले होते. मात्र, भाजपने त्यांनाच गळाला लावल्याने नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेश लांबणीवर
मामा राजवाडे यांना ठाकरे गटाने महानगरप्रमुख केल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात सुनील बागुल आणि राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांची पथकं या दोघांना शोधत होती. त्यातच गुरुवारी (दि. 03) सुनील बागूल आणि मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. राजकीय साधनशुचिता आणि पोलीस यंत्रणेच्या गैरवापराचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला होता. यानंतर भाजपने सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा पक्षप्रवेश तुर्तास थांबवल्याची माहिती समोर आली.
महानगरप्रमुखपदी प्रथमेश गितेंची नियुक्ती
सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाने दोघांची हकालपट्टी करत नवीन महानगरप्रमुखाची नेमणूक केली. शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक महानगरप्रमुखपदी माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
आणखी वाचा