Nashik News Updates : 'कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू, कुणी आईच्या कुशीत शिरतय, तर कुणी वडिलांना मिठी मारतंय' हे आनंदाचे क्षण नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील दीक्षांत सोहळ्यात अनुभवयास मिळाले. नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत संचलन सोहळा पोलीस महासंचालक रजनीश शेठ  यांच्या उपस्थितीत पार पडला. परीक्षा मेहनत अन् आता सेवेत दाखल झाल्याने प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 


सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पोलीस दलाकडून जनतेच्या आणि सरकार यांच्या अपेक्षा वाढत आहेत. नवी आव्हाने समोर येत आहेत. तेव्हा या सगळ्यासाठी तयार रहा असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.120 च्या दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले.


दरम्यान प्रबोधिनीमध्ये अतिशय खडतर प्रवासातून या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापुढे ही नवनवीन गोष्टी आत्मसात करून ज्ञानात भर घालावी. नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करत जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडावी असे आवाहन शेठ यांनी यावेळी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केले. जवळपास 278 पुरूष 116 महिला असे एकूण 394 नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश यामध्ये आहे. प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


सदर 394 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण 24 जून 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते. 10 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पूर्ण केले. या काळात भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा स्थानिक आणि विशेष कायदे यांची माहिती घेतली. फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव असे प्रशिक्षण पूर्ण केले आहेत.


शीतल टेंभेला उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार


महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.120 च्या दीक्षांत संचलन समारंभात 394 अधिकारी पोलीस दलात दाखल झाले. यावेळी 120 व्या तुकडीतील शीतल टेंभे हीस उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शीतल यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 


मंत्र्यांविना दीक्षांत सोहळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोहळ्याला उपस्थिती असणार होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा दीक्षांत सोहळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याविनाच पार पडला. केवळ पोलीस दल प्रमुखांची शाबासकी यावेळी उपनिरीक्षकांना मिळाली. तर पोलीस अकॅडमी तर्फे कार्यक्रमाला कोणतीही राजकीय व्यक्ती नसेल असे सांगण्यात आले होते.
 
उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, बेस्ट स्टडीज कॅडेंट, बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच या तिन्ही पुरस्कारावर शीतल टेंभेने नाव कोरले. तर संध्याराणी देशमुख हिस बेस्ट ऑलराउंडर वूमन कॅडेंट ऑफ द बॅच आणि सेकंड बेस्ट ट्रेनी हे दोन्ही पुरस्कार संध्याराणी देशमुख यांना मिळाले.