Nashik Gudhipadwa : भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थात हिंदू नववर्षारंभानिमित्ताने सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक (Nashik) शहरात विविध भागात कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. आज शहरात स्वागत यात्रांसह हिंदू हुंकार सभा, बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आदी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. 


साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळख असलेल्या गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात नाशिक शहरात साजरा होत आहे. आज नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरभरातून पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात स्वागतयात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वागतयात्रांबरोबरच शहरात हिंदू हुंकार सभा (Hindu Hunakar Sabha) तर सातपूर परिसरात बारा गाड्या ओढण्याचा पारंपारिक कार्यक्रम देखील पार पडणार आहे. भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सातपूरला (Satpur) 130 वर्षांहून अधिक काळ अखंडीतपणे गुढी पाडव्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


नाशिक शहरातील सिडको परिसर, इंदिरानगर परिसर, सातपूर आदी भागात स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिडको परिसरात सिडको सांस्कृतिक कला मंडळातर्फे गुढी उभारण्यात येणार आहे. तर इंदिरानगर मधील सात वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वागत यात्रा निघणार आहे. सातपूर परिसरात महागुढी उभारण्यात येणार असून सायंकाळी 12 गाडी ओढण्याचा पारंपारिक उत्सव देखील साजरा करण्यात येणार आहे. तब्बल 130 वर्षांची ही परंपरा अखंडितपणे सुरु असून कोरोना काळात दोन वर्ष या उत्सवात खंड पडल्यानंतर यंदा मात्र उत्साहाचे वातावरण आहे. 


दरम्यान, शहरात नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. साक्षी गणपती मंदिर, भद्रकाली कारंजा, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणावरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तीनही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, दुतोंड्या मारुती शेजारी, गोदाघाट येथे संपन्न होणार आहे. पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली जाते. यात लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब, महिला बाईक सफारी, मंगळागौरीचे खेळ आणि मर्दानी खेळांचे सहभागी आहे.


स्वागत यात्रांना प्रचंड प्रतिसाद


दरम्यान, शोभायात्रेत ढोल ताशे, लेझीम पथक, चित्ररथ, मल्लखांब, बाईक रॅली मंगळागौरीचे खेळ आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून ठिकठिकाणी स्वागत यात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.