नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे..त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सतीश खरे 19 मेपर्यंत एसीबीच्या कोठडीत असून त्यांनी मोठं घबाड गोळा केल्याचा संशय आहे. दरम्यान आज खरेंच्या इतर बँक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार असून आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.


भ्रष्टाचारात नाशिक विभाग सध्या पहिल्या क्रमांकावर आला असून गेल्या 117 दिवसात तब्बल 66 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. दोनच दिवसांपूर्वी 30 लाखांची लाच स्वीकारताना सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांना  रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सतीश खरे हा 19 मेपर्यंत एसीबीच्या कोठडीत असून त्यांनी मोठं घबाड गोळा केल्याचा संशय आहे. खरेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध बँकेत 13 खाती आहेत. त्यापैकी काल 8 खाती उघडण्यात आली असता त्यात 43 लाख 76 हजार रुपये आढळून आलेत. आज त्यांच्या इतर बँक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार असून आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.


तब्बल 30 लाखांची लाच घेत सहकार खात्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या नाशिक जिल्हा उप निबंधक सतीश खरे यांचे 'खोटे' कारनामे आता उजेडात येऊ लागले आहे.  ज्या ठिकाणी खरे यांनी नोकरी केली त्या  ठिकाणी सहकारी संस्था अडचणीत आणत भ्रष्टाचार करून कोट्यवधीची माया जमवली असल्याचा आरोप करत येवला मर्चंट्स बँकेचे संचालक व भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यातील काही आमदार व राजकीय नेते यांच्या संगनमताने जमिनी व प्लॉट खरेदी केल्याचाही त्यांनी संशय व्यक्त करतांना या सर्व प्रकाराची इडी, सीबीआय या संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाची तक्रार ई मेलद्वारे देशाचे पंतप्रधान व सहकार मंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.


लाचलुचपत विभागाने रचला  सापळा


 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी आणि निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील सभद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधित लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे आणि त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.