नाशिक : आजवर मुलांना मोबाईल फोनपासून (Mobile Phone) दूर ठेवण्यासाठी पालकांचा आटापिटा बघितला आहे. मात्र नाशिकमध्ये (Nashik) शिक्षकांनाच मोबाईल फोनपासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे. नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांना (Teachers) मोबाईल बंदी करण्यात आली आहे. अध्यापनापेक्षा शिक्षकांचे मोबाईलमध्येच जास्त लक्ष असल्याचं निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही शिक्षकांवर वॉच ठेवला जाणार आहे.


कोरोना काळात जे प्रशासन शिक्षकांना अधिकाधिक मोबाईल फोनचा उपयोग करुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे देण्याचा सूचना करत होते. आज त्याच प्रशासनाने शिक्षकांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी आणली आहे. शिक्षक शाळेत येताच मुख्याध्यापकांकडे त्यांना मोबाईल स्विच ऑफ करुन जमा करावा लागतो. मोबाईल फोन जमा करताना आणि शाळा सुटल्यावर मोबाईल पुन्हा ताब्यात घेताना शिक्षकांना नोंद वहीत स्वाक्षरी करावी लागते. मनपाच्या सर्वच शाळांमध्ये आदेशाची अमलबजावणी केली जात आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून आदेशाची अंमलबजावणी होतेय की नाही याची पाहणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून येत्या काही दिवसात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मनपाच्या सर्व शाळांमधील प्रत्येक वर्गाचा आढावा मुख्यालयातून घेतला जाणार आहे.


शिक्षकांच्या कुटुंबियांना मुख्याध्यापकांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा पर्याय


विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांच्या ज्ञानार्जनाच्या कार्यात मोबाईल फोन अडथळा ठरत आहे. शिक्षक वर्गात असताना कोणाचा कॉल आला तर शिक्षक गप्पामध्ये दंग असतात आणि तोवर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. काही शिक्षक तर विद्यार्थ्यांना फळ्यावर अभ्यास लिहून देतात आणि मधला वेळ सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये घालवतात. काहींना व्हिडीओ गेमची गोडी तर काहींना शेअर मार्केटमध्ये रस असल्याने प्राधान्यक्रमात गल्लत होऊन शिक्षक आपल्या कर्तव्यापासूनच दूर जात असल्याचे निरीक्षण नोंदण्यात आलं. त्यामुळेच मनपाच्या शाळांमध्ये शिक्षकांना मोबाईल फोन वापरण्यात बंदी करण्यात आली आहे. कुटुंबियांना अतिमहत्त्वाच्या कामासाठी शिक्षकांशी संपर्क साधायचा असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून मुख्याध्यापकांचा मोबाईलवर संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यापलीकडे शिक्षक मुख्याध्यापकांसमोर दुसरा पर्याय सध्यातरी नाही.


कुटुंबातील संवाद वाढवण्याचे पालकांना आवाहन 


मनपा शिक्षण विभागान शालेय कामकाजाच्या वेळेत शिक्षकांवर मोबाईल बंदी घातली असतानाच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनाही मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनपासून कमीत कमी दोन तास दूर राहण्याचं आवाहन केले आहे. सायंकाळच्या वेळी विद्यार्थी पालक मोबाईल फोनमध्ये डोकं घालून बसत असतात तर आई-आजी टीव्ही मालिकांमध्ये रमून जात असल्याने पालक आणि पाल्यांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळेच कुटुंबातील संवाद वाढवण्याचे आवाहन पालकांना करण्यात आलं आहे. त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी किती दिवस केली जाते या वरच त्याचे यश अवलंबून आहे.


हेही वाचा


Nashik News : नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे निधन; शिक्षण क्षेत्रावर दुःखाचा डोंगर 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI