नाशिक : नाशिकच्या सायखेडा ग्रामपंचायतमध्ये (saykheda Grampanchayat) आलेला एक अर्ज सध्या जिल्हाभर चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. आई वडिलांना विचारल्याशिवाय रजिस्टर लग्न करता येणार नाही, असा ठराव करावा, एवढेच नाही तर असा कायदा करून शासनाकडेही पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी यातून करण्यात आली असून या पत्रामुळे गावातील राजकारणही चांगलेच पेटले आहे. 


नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील साडेआठ हजार लोकसंख्येचं हे आहे सायखेडा गाव.. शेती हा या गावचा मुख्य व्यवसाय.. एरव्ही शांत आणि कधीही चर्चेत न आलेल्या या गावचे नाव सध्या मात्र जिल्हाभर चांगलेच गाजते आहे आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे ग्रामपंचायतीच्या एका माजी सरपंचाने 11 ऑगस्ट रोजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसभेत एक पत्र देत केलेली मागणी आहे. या पत्रात काय म्हटलंय तर 'गुजरातप्रमाणे आई वडीलांची परवानगी न घेता रजिस्टर लग्न (Love Marriage)करणाऱ्या मुला मुलींची रजिस्टर नोंद करू नये. आपल्याकडे देखिल कायदा व्हावा असा ग्रामसभेमध्ये ठराव करून शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा ही विनंती, असा मजकूर लिहलेला आहे. 


दरम्यान हे पत्र सोशल मिडीयावरही (social Media) चांगलेच व्हायरल होताच सायखेडा ग्रामपंचायत ही चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. यात एक गंमतीचा विषय म्हणजे ग्रामसभेत हे पत्र देऊन मागणी करणारे माजी सरपंच भाऊसाहेब कातकाडे यांची पत्नी सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे तर सरपंचही त्यांचे नातेवाईकच आहे. त्यामुळे भाऊसाहेब कातकाडे यांनी जरी गावकरी म्हणून ही मागणी केली असली तरी मात्र ग्रामपंचातीच्या सदस्यांचा एक गटच नोंदणी विवाहासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक करण्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याची गावात चर्चा असून सदस्यांचा दुसरा गट मात्र याला कडाडून विरोध करत असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच या पत्रामुळे गावचे राजकारणही चांगलेच पेटल्याने गावचे ग्रामसेवक मात्र मीडियापासून दूर पळत आहेत.  


तर अशी मागणी करणारे माजी सरपंच भाऊसाहेब कातकाडे म्हणाले की 'मी ग्रामसभेत हे पत्र देऊन आई वडीलांची परवानगी न घेता रजिस्टर लग्न करणाऱ्या मुला मुलींची रजिस्टर नोंद करू नये, अशी मागणी केली आहे. आई वडिलांना याचा त्रास होतो, ठराव लिहून आम्ही शासनाकडे पाठवू, खूप चांगली मागणी आहे, निर्णय घ्या, असे मला खूप फोन आले', असे ते म्हणाले. तर सदस्य मनोज भुतडा म्हणाले की, गुजरात राज्याने हा कायदा मंजूर केला आहे, माजी सरपंचाने जो अर्ज केला, तो उपक्रम आम्ही राबवत आहोत. हा निर्णय प्रत्येक ग्रामपंचायत, महापालिकेने घेतला पाहिजे, जेणेकरून शासनावर दबाव येईल आणि कायद्यात कसे बदल येऊ शकतील. लव्ह जिहादचे दुष्परिणाम आपण बघतोच आहे, सायखेडा ग्रामपंचायतीने ही सुरुवात केली आहे. सरकारने निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. 


सदस्य म्हणाले...


अकरा ऑगस्टला ग्रामसभा संपत असतांना शेवटच्या मिनिटाला हा अर्ज आला होता. अर्धे सदस्य यावेळी निघून गेले होते. असा कोणताही ठराव झालेला नाही. ही मागणी आमच्या गावासाठी घातक झाली आहे, कारण बाहेर असा मेसेज गेला आहे की गावातील मुली लग्नाला आहेत आणि ईथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे ठराव करत आहेत, ग्रामसेवकाचा फोन पण स्विच ऑफ आहे, असा कोणताही ठराव झालेला नाही, लिहिलेला नाही. एकूण 17 सदस्य आहे, गावात त्यात 9 महिला आहेत. माझे स्वतःचे लव्ह मॅरेज आहे. शासन मॅरेजसाठी प्रोत्साहन देते, अनुदान देते तर दुसरीकडे असा ठराव कसा होईल. महिलांसाठी एक विशेष ग्रामसभा घेऊन यावर चर्चा केली पाहिजे. एकीकडे हे राजकारण करत आहेत, मात्र दुसरीकडे कुटुंब बदनाम होणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य अशपाक शेख यांनी दिली. कायद्यानूसार मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 हे लग्नासाठी योग्य समजले जाते. विवाह नोंदणीसाठी कुठलीही अट टाकणे हे कितपत कायदेशीर ठरेल हा प्रश्नच असून सायखेडा ग्रामपंचायतीने अशा कोणत्या प्रकारचा ठराव केल्यास तो महाराष्ट्रात ऐतिहासिक ठरेल की वादग्रस्त ठरेल हेच आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे..


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik : लव्ह मॅरेज करायचंय? आधी आई-वडिलांचं परवानगी पत्र आणा, नाशिकमधील ग्रामपंचायतीचा ठराव?