Nashik News : मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गाचे (Samrudhhi Highway) काम करणाऱ्या कंपनीने शेताला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन (Water Supply) गेल्या सहा महिन्यापुर्वी फोडली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास पीक घेता आले नाही. यामुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


बहुचर्चित समृद्धी महामार्ग राज्यातील महत्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे. सध्या हा महामार्ग तयार होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमधून (Nashik) गेलेल्या या समृद्धी महामार्गात सिन्नरसह इगतपुरीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. दरम्यान इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील धामणी येथील निवृत्ती पुंजा भोसले यांची साडेचार एकर बागायती जमीन आहे. या ठिकाणी जीव्हीपीआर कंपनी समृध्दी महामार्गाचे काम करत आहे. गेल्या सहा महिन्यापुर्वी या कंपनीने निवृत्ती पुंजा भोसले यांच्या बागायती जमीनीला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फोडल्यामुळे पिकांना पाणी मिळणे मुश्कील झाले. पुढील सहा महिने भोसले यांना पीकच घेता आले नाही. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. 



समृद्धी महामार्गाचे काम सुरु असलेल्या परिसरात भोसले यांची जमीन आहे. दरम्यान काम सुरु असताना भोसले यांची नऊशे फुट पाण्याची पाईप लाईन फुटली. कंपनीने त्वरीत पाईप लाईन जोडुन द्यावी, अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाकडे केली. मात्र कंपनीने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पिकांना पुरवठा होऊ न शकल्यामुळे बागायती पीके पाण्याअभावी जळत असल्याचे पाहुन निवृत्ती भोसले यांनी कर्ज काढुन पुन्हा पाईपलाईन दुरुस्त केली होती. त्यानंतरही काम करणाऱ्या या कंपनीने पाईप लाईन फोडल्यामुळे तब्बल सहा महिने पीक घेता आले नाही. भोसले याना हृदय विकाराचा झटकाही आला. नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी अनेक वेळा कंपनी व्यवस्थापनाकडे मागणी करूनही कंपनी दुर्लक्ष करत असल्याने अखेर निवृत्ती भोसले यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांची प्रकृति चिंताजनक असुन त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे धामणी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.


घरांना गेले तडे 
मागील दोन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. सुरवातीला महामार्गाच्या कामासाठी जिलेटीनच्या कांड्या वापरुन स्फोट करण्यात आले होते. त्यावेळी परिसरातील अनेक नवीन बांधकाम केलेल्या बंगले व घरांना तडे गेले होते. यावेळी तडे गेलेल्या घरांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन या कंपनीने दिले होते. मात्र अद्याप दोन वर्ष उलटुनही एकाही बंगला अथवा घर मालकाला नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.