नाशिक : राज्यात  यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती (Drought In Maharashtra) असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. सरकारने नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर  नाही  केला तर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.  


नाशिकच्या येवल्यापेक्षा नांदगाव तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याचा दावा आमदार कांदे यांनी केला आहे.  नांदगांवमध्ये दुष्काळ जाहीर न झाल्याने नांदगांव तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. चांदवड देवळा तालुक्यातही दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली आहे. अन्यथा जनतेसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सरकारला घरचा आहेर दिला आहे.


नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे तालुके दुष्काळग्रस्त आहे. राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय यात नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्याचा समावेश. पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव, भुजबळ यांचा येवला आणि सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.


40 तालुक्यात दुष्काळ जाहीर


राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळाकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट


दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल .मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली.  यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.  राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत 12 टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.