Nashik Bus Fire : नांदगाव बसस्थानकात (Nandgaon) उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने या घटनेत बस पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेली. बसमधील चालक-वाहकासह सर्व प्रवासी हे खाली उतरलेले असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. बस स्थानकात गाडीने पेट घेतल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या बस प्रसंगावधान राखत बाजूला केल्याने आणि प्रवासी बाजूला झाल्याने इतर नुकसान टळले. दरम्यान, बसला आग (Bus Fire) लागली तेव्हा आग थोड्या प्रमाणात होती, मात्र आग विझवण्यासाठी योग्य ती साधनसामुग्री वेळेत उपलब्ध न झाल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. बॅटरीच्या शॉर्ट सर्किट (Short Circuit) झाल्याने बस पेटली असावी, असा अंदाज बसस्थानक आगार प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.


याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव आगाराची (Nandgaon Bus Stand) बस ही चाळीसगावहून नांदगाव येथे साडेसहा वाजता चालक ज्ञानेश्वर एकनाथ थोरे आणि वाहक अरविंद शिवाजी ताडगे हे घेवून पोहोचले. बसमधील चालक - वाहकासह सर्व प्रवाशी खाली उतरल्यानंतर कंट्रोलरला माहिती देवून गाडी डेपोमध्ये लावावी, म्हणून चालक ज्ञानेश्वर थोरे हे कंट्रोलर जवळ पोहोचलेच होते. तेवढ्यात बसने अचानकपणे पेट घ्यायला सुरुवात केली. चालकाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र सुरुवातीला आग विझवण्यासाठी उपलब्ध असलेली अग्निरोधक साधनसामुग्री कमी असल्याने बसने वेगात पेट घेतला. 


त्यानंतर 8 अग्निरोधकाच्या सहाय्याने स्थानकातील यांत्रिक कर्मचारी, आगारातील कर्मचारी तसेच विजय झोडगे, राहुल पगारे, क्रांती निळे, संतोष सांगळे, राहुल पेहेरे, वाल्मीक पवार आदीसह स्थानिकांनी आज विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. टँकरमधून पाणी आणून शेवटी आग विझवण्यात आली. यादरम्यान, नांदगाव नगरपरिषद आणि मनमाड नगर परिषदेला दूरध्वनी वरून अग्निशमन बंबाची मागणी करण्यात आली. मात्र नांदगाव अग्निशमन दलाच्या वाहनावर चालकच नसल्याने गाडी असून आग विझवण्यासाठी तिचा उपयोग झाला नाही तर मनमाड येथील अग्निशमन आग विझल्यानंतर दाखल झाली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.


प्रवासी वेळीच उतरले म्हणून.... 


नाशिकच्या (Nashik) नांदगाव बसस्थानकात उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील चालक - वाहकासह सर्व प्रवासी हे खाली उतरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. सुरवातीला बसमधून धूर येत होता. यामुळे वाहक आणि चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. आजूबाजूला उभ्या असलेल्या बस प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या. तसेच प्रवाशांना तात्काळ बाजूला हलविण्यात आल्याने इतर नुकसान टळले. दरम्यान, बसला आग लागली तेव्हा आग थोड्या प्रमाणात होती, मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्याची साधनसामुग्री वेळेत उपलब्ध न झाल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Bus Fire : नाशिकमध्ये थरार! चालत्या बसने घेतला पेट, चालकाचं प्रसंगावधान, 35 प्रवाशांचे वाचले प्राण!