Nashik News Updates:
  
अवघ्या काही तासावर 31 डिसेंबर (New Year Celebrations) येऊन ठेपला असून नाशिक पोलीस (Nashik Police) प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात अनेक भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिक अन्न व औषध प्रशासनाने देखील शहरातील महत्वाच्या हॉटेलमधील मद्य व अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात येत आहेत. 

 

नाशिक जिल्हयामध्ये सरत्या वर्षास निरोप देवून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात हॉटेल, क्लब, कॅन्टिन, ढाबे या ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर हॉटेलसह इतर ठिकाणी मोठया प्रमाणात अत्रपदार्थांची मागणी असते. तेव्हा मागणी वाढल्याने निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थांची विक्री होण्याची दाट शक्यता असते. तसेच अल्कोहोलिक बेव्हरेजेसला मागणी देखील वाढते. त्यात 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी हॉटेल्सला प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात हॉटेल तपासणी मोहिम हाती घेतली आहे. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर  अन्न व औषध प्रशासनानं हॉटेल तपासणी मोहिम हाती घेत व्हेज व नॉनव्हेज अन्नपदार्थांची तसेच मद्याचे नमूने घेतले.

 

नाशिक जिल्ह्यातील मोठ्या हॉटेल्सची तपासणी

नाशिक जिल्ह्यातील मोठ्या हॉटेल्सची तपासणी करुन त्याठिकाणी अन्नपदार्थ हे आरोग्यदायी वातावरण तयार करण्याबाबत हॉटेल व्यवसायिकांना तपासणीअंती सूचना देण्यात आलेल्या असून तपासणीवर सुधारणा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच हॉटेल्स मधून मोहिमेअंतर्गत चिकनटिक्का मसाला, चिकन करी, पनीर, पनीर चिली, मटनमसाला, चिकन टिक्का मसाला, दही, पनीर टिक्का मसाला, गिक्स क्रेज इत्यादी चे 20 नमुने घेवून विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले आहेत. 

 

नमुन्यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधित हॉटेल व्यवसायिकांवर कडक कारवाई


दरम्यान सदर नमुन्यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधित हॉटेल व्यवसायिकांवर कडक कारवाई घेण्यात येईल. हॉटेल मधून विक्री होणा-या मद्याचे देखील जसे व्हिस्की, वाईनचे देखील नमुने अन्न व औषध प्रशासनामार्फत घेण्यात आलेले असून अहवाल प्राप्त होताच त्यासंदर्भात पुढील कार्यवाही घेतली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी साध्या व आरोग्यदायी स्थितीत बनविलेल्या अन्नाचे सेवन करावे तसेच खरेदी बिले घ्यावीत. सदरची मोहिम नाशिक विभागाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विवेक पाटील, गो. वि. कासार, योगेश देशमुख, अ.उ.रासकर, संदिप देवरे, प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी राबविली.


 

ही बातमी देखील वाचा