Rishabh Pant Accident: आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती तीन दुखद बातम्यांनी झाली. पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन झालं. दुसरी बातमी फुटबॉलचे देव पेले यांचं निधन आणि तिसरी बातमी होती भारतीय संघाचा क्रिकेटपटू रिषभ पंतच्या अपघाताची. आज सकाळी रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात रिषभ गंभीर जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या ट्विटनुसार, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. चेहऱ्यावरील जखमांसह इतर जखमा आणि ओरखड्यांवर डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी देखील केली असल्याची माहिती आहे. उद्या शनिवारी ऋषभ पंतचा घोटा आणि गुडघ्याचा एमआरआय होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. पंतच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत आणि उजव्या गुडघ्यात एक लिगामेंट फाटले आहे परंतु सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे बीसीसीआयनं म्हटलं आहे.
बीसीसीआयनं म्हटलं आहे की, भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे उत्तराखंडच्या रुरकीजवळ कार अपघात झाला. त्याला सक्षम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर झालेल्या दुखापतींवर उपचार करण्यात आले. ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी दुखापत झाली आहे तर गुडघ्याचे एक लिगामेंट फाटले आहे. त्याच्या उजव्या गुडघ्यात आणि त्याच्या उजव्या मनगटात, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीलाही दुखापत झाली आहे.
ऋषभची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. याच ठिकाणी त्याचे एमआरआय काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता. यावेळी त्याला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला. गाडीला आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची विंडोस्क्रीन तोडली. हरियाणा रोडवेजच्या बसचा चालक आणि इतरांनी त्याला तिथून बाहेर पडण्यास मदत केली, असे हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमध्ये एकटाच असलेल्या पंतला डुलकी लागल्यानं आग लागण्यापूर्वी कार डिव्हायडरला धडकली, असंही सिंह यांनी सांगितलं.