नाशिक :  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे, शेतकर्‍यांचे मार्गदर्शक आणि शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचे निधन झाले आहे. शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी 80 -81 साली शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन उभारले होते. 


आठ-दहा दिवसांपासून माधवरावांची प्रकृती अधिकच खालावली होती. माधवराव मोरे यांनी सन 1980-81 च्या काळात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करून शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारले होते. महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने देशात शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली होती. या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्र सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पंजाबसह अनेक प्रांतात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारला होता. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं.


दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली असून मी व माझे कुटुंबीय मोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. मोरे यांच्या निधनाने देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज हरपला असून शेतकरी चळवळ कायमची पोरकी झाली असल्याच्या शोकभावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.






तसेच ऊस आणि कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रभर शरद जोशी व माधवराव मोरे यांच्या नेतृत्वात रेल रोको, रास्ता रोको आंदोलन उभे केले होते. त्यांनी शेतकरी आंदोलनाची धार कधीच कमी होऊ दिली नाही कायम तीव्र लढा उभा केला. त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून शेतकरी संघटनेची अपरमित हानी झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Nashik Tomato Market : नाशिकच्या गिरणारे बाजारपेठेत दिवाळीनंतर टोमॅटोचे दर का घसरलेत? नेमके कारण काय?