Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पाठोपाठ महायुतीमध्येही (Mahayuti) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटापुढे शरद पवार गटाने जसे आव्हान उभे केले तसेच शिंदेच्या शिवसेनेपुढे भाजपचे इच्छुक आव्हान उभे करत आहेत. या वादात वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथानेदेखील उडी मारली आहे.


महाराष्ट्रातील मोजक्या मतदारसंघापैकी नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीआधीच कमालीचा चर्चेत राहिलाय. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात विखुरल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय. 


दिनकर पाटलांकडून उमेदवारीची घोषणा


सलग दोन टर्मपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हेमंत गोडसे (Hemant Godse) शिंदेच्या शिवसेनेत आहेत. विद्यमान खासदार हेमंत गोडसे 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवार असतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच कधी साधू महंत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तसेच भाजपचे पदाधिकारीही रणशिंग फुंकत आहेत. हेमंत गोडसे यांच्या कारकिर्दीत विकासकामे झाली नाहीत, असा दावा करत भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केलीय. 


वारकरी, महानुभाव पंथाच्या पदाधिकाऱ्यांचा पाटलांना पाठींबा


अद्याप जागा वाटप निश्चित नाही, नाशिकची जागा भाजपला सुटेल की नाही याची शास्वती नाही, तरीही भाजप पदाधिकारी उमेदवारीची घोषणा करत असून, वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला पाठींबा दिला आहे. गोडसेंना डावलून पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी करणार आहोत, असे अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज रायते आणि महानुभाव पंथाचे पदाधिकारी  ईश्वरभक्त भाईदेव मुनी यांनी म्हटले आहे. 


जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा - दादा भुसे


लोकसभा मतदारसंघावर केल्या जाणाऱ्या दाव्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या असून निवडणूक जिंकणे तर दूरच पण आधी तिकीट मिळविण्यासाठीच सर्व शक्ती पणाला लावावी लागत आहेत.  त्यातच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जागा वाटपाचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीचा असल्याचे सांगत वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे.


महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता


एकंदरीतच निवडणूक जसजशी डोळ्यासमोर येत आहे. तसतशी इच्छुकांची संख्या वाढत असून जागा वाटपाचा तिढा अधिकाधिक वाढत चालला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून अनेक उमेदवार इच्छुक म्हणून दावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात राडा झाला होता. आता भाजपच्या दिनकर पाटलांनी नाशिक लोकसभेवर दावा केल्याने महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आणखी वाचा 


Dada Bhuse : मंत्रालयात झालेल्या प्रकाराचं मी समर्थन करत नाही पण…; मंत्रालयातील गुंडाच्या व्हिडीओवर दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया