Nashik Latest News Update : नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ड्रोन कॅमेऱ्याबाबत काढलेला एक आदेश सध्या वादग्रस्त ठरत आहे. ड्रोनमालकांवर यामुळे मोठं संकट कोसळलं आहे.
एका अजब फतव्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ड्रोनबाबत काढलेल्या फतव्याच्या आदेशावरुन ते चर्चेत आले आहेत. नाशिकमध्ये लष्करी हद्दीत एक महिन्यात दोनवेळा ड्रोन उडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. 25 ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्टिलरी सेंटरच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनवर 800 फूट उंचीवर ड्रोन उडाला होता. विशेष म्हणजे ही घटना ताजी असतांनाच 23 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील DRDO अर्थातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या परिसरात ड्रोनने घुसखोरी केली होती. खरं तर हे दोन्ही क्षेत्र देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आणि अति संवेदनशील आहेत आणि इथेच ड्रोनने घिरट्या घेतल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांसह राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा या घटनांचा सध्या तपास करत असून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातील सर्व ड्रोन चालक आणि मालकांसाठी पंधरा दिवस एक विशेष आदेश काढलाय.
शहरात लष्करी हद्दीत ड्रोन उडल्याच्या महिनाभरात दोन घटना समोर आल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी ड्रोनसाठी विशेष आदेश काढले आहेत. सर्व ड्रोन मालक, चालक आणि ऑपरेटर यांना आपले ड्रोन ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे, तिथे तात्काळ जमा करावे लागणार आहेत. ड्रोनने चित्रीकरण करायचे असल्यास त्याची परवानगी पोलीस आयुक्त कार्यालयातून घ्यावी लागणार आहे. ती परवानगी ज्या पोलीस ठाण्यात ड्रोन जमा केला आहे, तिथे दाखवून चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन मिळणार आहे. यावेळी सशुल्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली चित्रीकरण करून दिलेल्या मुदतीच्या आत तो ड्रोन सीलबंद करून पोलीस ठाण्यात जमा करावा लागणार आहे.
नाशिक पोलिसांनी काढलेला ड्रोनचा अजब आदेश ड्रोन मालकांना मान्य नाहीये. स्वतःच्या मालकीचा ड्रोन त्यांना आरोपींप्रमाणे पोलिसांच्या ताब्यात ठेवावा लागणार आहे. विशेष म्हणजे जेव्हा ड्रोन उडवायचा असेल तेव्हा सशुल्क पोलीस सोबत नेण्यासाठी ड्रोनमालकाला प्रत्येकी आठ तासांसाठी शिपाई असेल तर तीन हजार 890 रुपये, पोलीस नाईक असेल तर 4 हजार 535 रुपये तर हवालदारासाठी 4 हजार 676 रुपये आकारावे लागणार असून कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या ड्रोन मालकांना हा खर्च न परवडणारा आहे. आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करायला तयार आहोत, मात्र त्यांनी काहीतरी मार्ग काढावा अशी ते मागणी करतायत.
नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय हेल्मेटसक्तीच्या मोहीमेमुळे चांगलेच चर्चेत आले होते तर आता जयंत नाईकनवरे हे ड्रोनच्या आदेशामुळे वादात सापडले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं मान्य आहे, मात्र त्यासाठी ड्रोनमालकांनाही विश्वासात घेणं हे गरजेचं.