Nashik Latest News Update: एकीकडे महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात असताना जात पंचायतीच्या मनमानी कारभाराच्या घटना आजही निदर्शनास येत आहेत. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा घटस्फोट जात पंचायतीच्या पंचानी केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


नाशिकच्या आदिवासी पाड्यातून जात पंचायतीच्या जाचाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे. इगतपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला घटस्फोट घ्यायला भाग पाडल्याची समोर आली आहे. घटस्फोट घेताना पिडीत मुलींकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आले असून मुलाने दुसरं लग्न केल्यास हरकत नाही. मात्र मुलीने दुसरा विवाह केल्यास त्याला 51 हजार रुपये देण्याचे दंडक घालण्यात आले. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी विवाहित अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकिस आले. यात बालविवाह करणे, या बरोबरच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जात पंचायत मुठमाती अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर घटनेला अनेक कांगोरे असले तरी जात पंचायतने घटस्फोट घडवून आणल्याचे दिसून येत आहे. अशी जात पंचायत बसवून न्यायनिवाडे करणे कायद्याच्या विरोधात आहे. म्हणून संबधित जात पंचायतवर दाखल व्हावे, अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.


नेमकी घटना काय घडली? 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका गावात संबंधित अल्पवयीन मुलीचा विवाहसोहळा एप्रिल 2022 मध्ये  पार पडणार होता. मात्र श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हा विवाह सोहळा बंद पाडला. मात्र त्याच दिवशी संघटनेचे पदाधिकारी माघारी फिरल्यानंतर रात्री उशिरा हा विवाह पार पडला. यानंतर मुलगी चार महिने सासरी राहिली. काही वाद झाल्यामुळे ती पुन्हा माहेरी आली. त्यानंतर पुन्हा गेलीच नाही. हे लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबाच्या बैठक घेत दोघांचा घटस्फोट घडवून आणला. मात्र यावेळी स्टॅम्प पेपर वर मुलीकडून लिहून घेण्यात आले. की संबंधित मुलास दुसरे लग्न करण्यास हरकत नाही. मुलीच्या घरच्यांना मुलीला 51 हजार रुपये देणे बंधनकारक राहील. दरम्यान काल या मुलीला सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यातही या मुलीने संबंधित गावातील अल्पवयीन मुलाचे नाव घेतले. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी सांगितले.


जिल्ह्यातील तिसरे प्रकरण 
यापूर्वी देखील जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात जात पंचायतीचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये आंतरजातीय विवाह केल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असं पत्र सरपंचासह नाशिकमध्ये जातपंचायतीने विवाहाच्याच दिवशी मुलीकडून लिहून घेतलं होतं. तर दुसरा प्रकार नाशिक तालुक्यातील एका गावात 2018 मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये, म्हणून जात पंचायातीने कुटुंबावर दबाव टाकत वाळीत टाकलं. संशयिताने पीडित तरुणीबरोबर लग्न करण्याबाबत दिलेलं लेखी आश्वासन पाळण्यास नकार दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.