नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) शोधण्यासाठी राज्यभर मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानंतर आता नाशिक महापालिका देखील मोहीम राबविणार असून पुढील चार दिवसात 1897 ते 1967 या दरम्यान मराठा कुणबी व कुणबी मराठा जातसंवर्ग शोधण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य विभागाच्या मदतीने जातसंवर्ग शोधले जाणार असून हे अभियान फत्ते होत नाही तोपर्यत महापालिकेच्या शिक्षकांसह जन्म मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्यांनी कुठलीही सुट्टी न घेता काम मार्गी लावण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.
राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने (Nashik District) देखील सर्च मोहीम सुरु केली असून आता नाशिक महापालिकेकडून (Nashik NMC) देखील शोध मोहीम राबविण्यात येत आहे. कुणबी नोंदी शोधण्याच्या सूचना आयुक्तांनी देत पुढील चार ते पाच दिवसात नोंदी शोधल्या जाणार आहेत. मराठा कुणबी व कुणबी मराठा जातसंवर्ग शोधण्यासाठी 1897 ते 1967 मधील जन्म नोंदी तसेच शाळेत प्रवेशावेळीच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे याकामासाठी पालिकेच्या मुख्यध्यापकांसह शिक्षकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिकेपूर्वी नाशिक नगरपालिका होती. त्यावेळी दहा बाराच्या आसपास शाळांची संख्या होती. परंतु जात संवर्गाच्या नोंदी शोधण्यासाठी शिक्षकांना पुढच्या चार-पाच दिवसात कोणालाही सुट्या घेता येणार नसल्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
दरम्यान सरसकट मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Arakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर सध्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू आहे. त्या संदर्भात मराठवाडयातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी- मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करायची आहे. या तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती पूर्ण करायची आहे. या संदर्भात राज्य सरकारने न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांची समितीस नेमली आहे. या समितीला अहवाल सादर करावयाचा आहे.
नोंदी मोडी लिपीत, जाणकार व्यक्तींची मदत लागणार
दरम्यान नाशिक शहरातील यापूर्वीच्या बहुतेक नोंदी या मोडी लिपीमध्ये आहे. त्यामुळे मोडी लिपी जाणकार व्यक्तींची मदत महापालिकेला घ्यावी लागणार आहे. पूर्व कार्यालयातील अनेक कागदोपत्रे मोडीमध्येच आहेत. त्यामुळे मोडी लिपी जाणकार व्यक्तींची आवश्यकता पालिकेला भासणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी बैठक घेत याकामी शिक्षकांची मदत घेणार असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या बैठकीनंतर शिक्षण विभागातर्फे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत 22 केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यात केंद्रप्रमुखांसह मनपा शाळेच्या 836 शिक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.