नाशिक : धनगर समाजाला (Dhangar Aarakshan) आदिवासी आरक्षणातून आरक्षण द्यावे, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे सलग 21 दिवस आंदोलन सुरु होते. मात्र या मागणीवरून आता नाशिक (Nashik) जिल्ह्यात आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज दिंडोरीसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर येत्या 1 ऑक्टोबर रोजी देखील आंदोलन करण्यात येणार आहे.  'धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नये' अशी मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे. 


आज सकाळी दिंडोरी (Dindori) शहरात मोठ्या संख्येने तालुका परिसरातील आदिवासी बांधवानी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. नाशिक-वणी रस्त्यावर आदिवासी समाजाचं रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारकडे आदिवासी समाजाच्या मागणीकडे गांभीर्याने घ्यावे असे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर आधीच आमच्या समाजात आरक्षण कमी असून इतरांना समाविष्ट करू नये, अशी मागणी यावेळी आंदोलकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी असंख्य आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तर त्र्यंबकेश्वर शहरातही आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आदिवासींमधून आरक्षण देण्याची धनगर समाजाची मागणी चुकीची असून आमचा त्याला विरोध आहे. अशी स्पष्ट भूमिका येथील आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली. 


1 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको 


दरम्यान काही दिवसांपूर्वीच नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्त्वात आदिवासी संघटनांची बैठक घेण्यात आली. यात धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्याची मागणी होत असून त्या मागणीला पूर्णपणे विरोध असल्याची भूमिका आदिवासी नेत्यांनी यावेळी मांडली. त्यानंतर हळूहळू नाशिक जिल्ह्यातून आदिवासी संघटना आक्रमक होत असून आज दिंडोरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर आदिवासी संघटनांकडून येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यभर आदिवासी जनआक्रोश आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आहे. 1 ऑक्टोबर रोजी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून अनेक भागात आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घोटी टोलनाक्यावर आंदोलन होणार असल्याची माहिती आहे. 


दुसरीकडे, अंतरावली सराटी गावामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून मराठा आंदोलन सुरु करण्यात आले होते. 17 दिवसांनी हे उपोषण थांबविण्यात आले, मात्र साखळी उपोषण अजूनही सुरु आहे. त्यातच धनगर समाजानेही आंदोलनाचे हत्यार उपसून सरकारला धारेवर धरले. मात्र 21 दिवसानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची शिष्टाई कामी आली, त्यानंतर धनगर उपोषण देखील सोडविण्यात आले, मात्र आता धनगर समाजाने केलेल्या मागणीवरून आदिवासी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : पद गेलं तरी बेहत्तर आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आमदार नरहरी झिरवाळांचा इशारा