नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या (Elections) दृष्टीने मोट बांधली जात आहे. मनसे देखील याच इराद्याने मैदानात उतरून महाराष्ट्र फिरत आहे. मात्र नाशिकमधून मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधून (Nashik) प्रथमच मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेले नितीन भोसले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला असून यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीला (Nashik NCP) बळ मिळाले आहे. 


एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार बैठक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण चांगलंच पेटणार असल्याचे चित्र आतापासून दिसायला सुरवात झाली आहे. अनेकजण नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कुणी घरवापसी तर कुणी नवा प्रवेश सोहळा करत आहेत. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे. मनसेचे (MNS) माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. 


नितीन भोसले हे 2006 पासून मनसेत काम करत होते. आठ वर्षे शहराध्यक्ष होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. त्यात नितीन भोसले हे पश्चिम नाशिक मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्येही त्यांनी निवडणूक लढवली मात्र, त्यांना यश आले नव्हते. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मध्यंतरी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, नाशिक महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर वातावरण बदलले आणि भाजप उमेदवार सतीश कुलकर्णी यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी नाराज होऊन तटस्थ राहणे पसंत केले होते. मध्यंतरी ते शिवसेनेत प्रवेश करणार होते मात्र हा विषय मागे पडला होता. त्यानंतर आता त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे


मनसेचा शिलेदार राष्ट्रवादीत.... 


नितीन भोसले यांनी मुंबईत जाऊन प्रवेश केला असून नाशिकमध्ये लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. त्यावेळी अन्य समर्थक प्रवेश करणार असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले. मुंबईतील प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आधी भाजपाच्या विरोधात लढण्याचा निर्धार करून नंतर भाजपाच्या महापौरपदासाठी मतदान करण्याचा आग्रह धरणाऱ्या मनसे नेत्यांना कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सध्या निवडणुकांचे वारे असले तर घेऊन पक्षात प्रवेश केलेला नाही. सरकार आल्यास नारपारचे पाणी मिळावे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मिळावी, एवढीच मागणी केल्याचे माजी आमदार नितीन भोसले यांनी सांगितले. 


इतर महत्वाची बातमी : 


अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचे उपसभापतींकडे अर्ज