नाशिक : एकीकडे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात (Onion Export) शुल्कावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असताना राजकीय नेत्यांमध्ये मात्र समन्वय नसल्याचे चित्र आहे. अशातच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आता अजबच सल्ला दिला आहे. 'ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही' असा अजब सल्ला सामान्य नागरिकांना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे. 


केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यात शुल्कावर 40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी संतापात असून आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत आंदोलने करण्यात आली. तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेत असताना केंद्राच्या या निर्णयाबाबत असमन्वय दिसून येत आहे. अशातच पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया देत 'कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे.


यावेळी दादा भुसे म्हणाले की, कांद्याचे दर (Onion Rate) कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार, यावर देखील व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र सरकार निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल, त्यामुळे हा सत्ताधारी, विरोधक असा विषय नाही. काही वेळा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतात, तर काही वेळा 2 हजारपर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावं लागतं. तसेच नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल, असेही ते म्हणाले. 


दरम्यान या निर्णयावर भुजबळांनी (Chhagan Bhujbal) देखील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान साहजिक आहे. त्यामुळे भाव पडू शकतात. या प्रतिक्रियेवर दादा भुसे म्हणाले की, हा निर्णय झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आज बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे दर पडले किंवा काय झालं, हे या क्षणाला बोलणं उचित नाही. मात्र कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. तसेच या विषयासंदर्भात किंवा चांगल्या गोष्टीसाठी पवार (Sharad Pawar) साहेबच काय, कुणी पण असेल, चांगलं मार्गदर्शन असेल, तर स्वागतच असेल, कारण कांद्याच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, असेही उत्तर दादा भुसे यांनी दिले.


दोन चार महिने कांदा खाऊ नका....


दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही प्रोब्लेम नाही. ज्यावेळी आपण 1 लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी 10 रुपये जास्त देऊन 20 रुपये देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही असा अजब सल्ला भुसे यांनी दिला. 


एसी केबिनमध्ये बसून प्रश्न कळत नाही...


दरम्यान समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढतच असून या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. यावर भुसे म्हणाले, समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अनेक उपाय राबवले गेले. अपघात रोखण्यासाठी इतर काही मार्गदर्शन आले, तर त्याची देखील अंमलबजावणी केली जाईल. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दादा भुसे म्हणाले की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जनतेमध्ये आल्यानंतर मतदार राजा काय असतो, हे कळेल. त्यामुळे एसी केबिनमध्ये बसून प्रश्न कळत नाही, असा खोचक टोलाही भुसे यांनी लगावला.



इतर संबंधित बातमी : 


Nashik News : "सांगा शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा"; कांदा प्रश्नावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय, कोण काय म्हणाले?