नाशिक : जालना (Jalna) येथील घटनेनंतर खबरदारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागातील बस सेवा बंद (Bus) करण्यात आली आहे. हळूहळू अनेक भागातील बस सेवा सुरु करण्यात येत आहेत. नाशिकमधून मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसेस बंद आहेत. तर नंदुरबारसाठी बस सुरु करण्यात आली आहे. अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर बस सेवा अजूनही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरु असल्याचे चित्र आहे. 


मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावातसुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे मोठा गोंधळ उडाला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. यात अनेक ठिकाणी एसटी बसेसचे नुकसान होत असून राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अहमदनगरकडे जाणाऱ्या अनेक बस सध्या डेपोतच उभ्या असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमधूनही (Nashik) अनेक बससेवा बंद आहेत. तर आज श्रावणी सोमवारनिमित्त 250 बसेस त्र्यंबकेश्वरसाठी (Trimbakeshwer) देण्यात आल्याने देखील प्रवाशांना इतरत्र जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 


दरम्यान नाशिकमधून दोन दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar), नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगरकडे (Chatrapati Sambhajinagar) जाणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. आज नंदुरबार बस सेवा सुरु करण्यात आली असून मराठवाड्याकडे जाणारी मुख्यत्वे जालना आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी बससेवा मात्र अद्यापही बंद आहे. तर अहमदनगरकडे एक एक बस सोडत असल्याचे नाशिक एसटी महामंडळ विभागाकडून सांगण्यात येत आहे. यात प्रवाशांचे मोठे हाल होत असून खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे आकारले जात असल्याचे समोर आले आहे. नाशिक ते हमदनगर बस भाडे हे साधारण 250 ते 275 रुपये इतके आहे. मात्र आजच्या घडीला खासगी वाहनचालक प्रत्येक सीटमागे 500 रुपये भाडे आकारत असल्याचे समोर आले आहे. 


राज्यातील अनेक आगारात बसेस बंद 


जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशी देखील राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तर गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी एसटी बसची तोडफोड करण्यात आली असून, गाड्यांची जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि एसटी बस यांचे होणारे नुकसान पाहता पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या अनेक बसेस थांवण्यात आल्या आहेत. अंदाजे 600 बस आज थांबवण्यात आल्या आहेत. तर आज सकाळपासून सोलापूर, जालना, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, अवसाकडे जाणारी एकही बस पुण्यातून सुटलेली नसल्याचे संबंधित आगार प्रमुखांचे म्हणणे आहे.  


इतर महत्वाची बातमी : 


मराठवाड्याला जाणार असाल तर थांबा; जालन्यातील घटनेनंतर पुणे, सांगली,औरंगाबाद, पंढरपूर, नगरहून सुटणाऱ्या एसटी बस रद्द