नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात ऐन दिवाळीत (Diwali) हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) आठ वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. हा मुलगा घराच्या ओट्यावर दिवाळीनिमित्त पणती लावत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.


नाशिकसह जिल्ह्यात (Nashik leopard) बिबट्याची दहशत कायम असून कालच पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला केला होता. यात मेंढपाळ जखमी झाला होता. या घटनेचा तपास सुरूच होता की सायंकाळी साडे सातच्या सुमारास (Dindori) तालुक्यातील निळवंडी येथील एक आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत बिबट्याने मुलाला परिसरातील उसाच्या शेतात नेत हल्ला चढविला. यात मुलाचा मृत्यू झाला आहे.  दिवाळी सण सुरु असून हा मुलगा घराच्या दारातच पणती लावत असताना बिबट्याने हल्ला चढविला. घरच्यांना काही कळायच्या आत बिबट्याने मुलाला उसाच्या शेतात नेले. गुरु खंडू गवारी असे या मुलाचे नाव आहे. 


दरम्यान, गेल्या एका वर्षातील ही दुसरी घटना असून मागील घटनेतही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्यालाही जीव गमवावा लागला. दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे हे घटनास्थळी दाखल होऊन मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले. दिंडोरी शहरासह निळवंडी, हातनोरे, वाघाड, जांबुटके, मडकीजांब परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.


मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला 


दरम्यान काल पहाटेच्या सुमारास दिंडोरी शहरात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. दिंडोरी शहरातील जाधव वस्तीवरील प्रकाश लक्ष्मण जाधव यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये मेंढपाळ आबा ठेलारी यांनी मेंढ्या बसविलेल्या होत्या. ठेलारी कुटुंब झोपल्यानंतर पहाटे 3 वाजेच्या सुमारास मेंढ्यांच्या दिशेने बिबट्या येऊन त्याने मेंढपाळ आबा ठेलारी यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. प्रकाश जाधव यांना ठेलारी यांचा आवाज आल्याने ते घटनास्थळी गेले असता ठेलारी यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले.