नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निकटचे सहकारी आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर (Jaydatta Holkar) यांनी राष्ट्रवादीच्या प्रांतिक सरचिटणीस पदाचा राजीनामा देत छगन भुजबळ यांना धक्का दिला आहे. समाजाला आरक्षणाची गरज असताना विरोध केला जात आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे होळकर यांनी समाजाच्या बैठकीत स्पष्ट केले.
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. या लढ्याला सर्व समाज बांधव एकत्र येऊन बळ देण्याचं काम करत आहेत. मनोज जरांगे यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित होत असलेला जनसमुदाय आरक्षणासाठी एकजूट होत असल्याचं सांगत आहेत. अशातच मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात सुरवातीला चांगलाच वाद पेटला होता. हा वाद शमला असला तरी भुजबळांना मात्र याची किंमत मोजावी लागणार असल्याचे दिसते आहे. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाच्या प्रांतिक सरचिटणीसपदासह 42 गाव प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. होळकर यांनी सरपंच ते लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदापर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. मंत्री भुजबळ हे येवला मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत असल्यापासून होळकर भुजबळांचे समर्थक आहेत.
लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Bajar samiti) निवडणुकीत होळकर यांनी भुजबळांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे नेतृत्वही केले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ हे आरक्षणाला विरोध करीत असल्याची भावना असल्याने त्यांना मराठा समाजाकडून विरोध होत आहे. होळकर यांनी भुजबळांची सोडलेली साथ हा त्याचाच भाग आहे. मनोज जरांगे यांनी येवला येथील सभेत मांडलेली भूमिका योग्य असल्याचे होळकर यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदांचा आपण राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भुजबळ यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडल्यानंतर पवारांच्या येवला येथील सभेला होळकर यांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती. होळकर बाजूला झाल्याने भुजबळांना लासलगाव मध्ये मतांची गोळा बेरीज करणे अवघड होणार आहे.
येवला आणि लासलगाव येथील जनता माझ्यासोबत
राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नाशिकमध्ये भुजबळ यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, या घटनांमधील मागील कारणे दाखवण्यासाठी असतात. आगामी काळात जिल्हा परिषदेची ही निवडणूक लागणार आहे, आपले काय होणार याची काळजी लोकांना असते. छगन भुजबळ स्वतः शिवसेना-भाजप सोबत अजित पवारांच्या गटात काम करतात, मग आपले पुढे काय, अशी काळजी अनेकांना सतावते. परंतु येवला आणि लासलगाव येथील जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत काम सुरूच राहील, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच 'माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे टीकाकार सांगतात. आता बोलण्यापासून कुणाला अडवावे, लोकशाही आहे. लोकांच्या वाटेल ते बोलण्यामागे प्रसिद्धी असते. माझ्याकडे इतकी संपत्ती असेल, तर मला पाचशे कोटी रुपये आणून द्या आणि माझी सर्व संपत्ती घेऊन जा, अशी 'ऑफर' देत भुजबळ यांनी टोला लगावला.
इतर महत्वाची बातमी :