नाशिक : 'मराठा समाजाच्या आरक्षणाला  (Maratha Reservation) आमचा विरोध नाही, 17 टक्क्यांमध्ये 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, यामुळे कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षाने देखील आपलं मत मांडलं पाहिजे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल, हे बघितलं पाहिजे, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. 


मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिकमध्ये (Nashik) असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आवाहनाला भुजबळांनी प्रतिसाद दिला आहे. काल विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केले. वडेट्टीवार म्हणाले की, "मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला काही हरकत नाही, मात्र यासाठी एक तर एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवा किंवा ओबीसींचा टक्का वाढवून मराठा समाजाला (Maratha Arakshan) ओबीसीत घ्या. आमची काही हरकत नाही. मात्र, टक्का न वाढवता मराठ्यांना ओबीसीत घेऊ नये. नाही तर दोन्ही समाजाचा काहीच फायदा होणार नाही." यावर आज भुजबळ यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र  17 टक्क्यात 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही," असे म्हटले आहे. 


भुजबळ यावेळी म्हणाले की, ओबीसींचा (OBC Reservation) आरक्षण फक्त 17 टक्के उरलेले आहे. या 17 टक्क्यात 400 जाती असून यामुळे सगळ्यांची अडचण होईल. 50 टक्क्यांची कॅप ओलांडून दहा टक्के ओपनला वाढवलेले आहे. भारत सरकारने आणखी दहा टक्के वाढवून त्यात मराठा समाजासह पटेल, कापू, जाट यांना आरक्षण द्या, म्हणजे सगळ्यांचा प्रश्न मिटेल. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, 17 टक्क्यांमध्ये 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, यामुळे कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) या सगळ्यांसह विरोधी पक्षाने देखील आपलं मत मांडलं पाहिजे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता धक्का मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितलं पाहिजे. सगळ्यांनी जाऊन दिल्लीत बसलं पाहिजे. हे सगळं सहज करता येणं शक्य आहे. नाहीतर या सगळ्या लढाया सुरुच राहणार आहेत, मोर्चे निघणार आंदोलन होणार, परत तोंडाला पानं पुसली जाणार आहेत. 


वरिष्ठ पातळीवर आरक्षणाबाबत हालचाली 


जालना येथील आंदोलनानंतर मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण तापले असून असून जालना येथील अंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. अशातच अनेक राजकीय नेते आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत असून अनेकजण आंदोलनाला पाठिंबा देत आहेत तर काहीजण आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण घेण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. 


विशेष अधिवेशन बोलवा : वडेट्टीवार 


राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. ते म्हणाले की, "आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, असं मला अनेक मराठा आंदोलकांनी सांगितलं. मी म्हटलं हरकत नाही. पण ओबीसींच्या आरक्षणात तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवून घ्यावी लागेल. किंवा ओबीसी आरक्षणाची जी 27 टक्क्यांची मर्यादा आहे, ती वाढवून घ्यावी लागेल. मग मराठा समाजाला आरक्षण देता येईल. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवून केंद्राकडे आरक्षणाचा प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने एक दिवसाचं अधिवेशन यासाठी वाढवावं. एक महिना काय पाच महिने दिले तरी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही." 


इतर महत्वाची बातमी : 


Vijay Wadettiwar Full Speech : ओबीसींचा टक्का वाढवून आरक्षण द्या त्यासाठी विशेष अधिवेशन : वडेट्टीवार