Nashik Latest News : कोरोना काळात पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांना पुन्हा परतण्याचे आदेश दिल्यानंतरही नाशिकमधील 150 कैदी नॉट रीचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्यावर्षी ज्यावेळी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी राज्यातील कारागृहांमध्ये सुद्धा कोरोनाने धुमाकूळ घातला होता. अनेक बंदिवानांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने सर्वच कारागृहातून हजारो कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजा म्हणजेच पेरोलवर सोडण्यात आले  होते. त्यानुसार नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातुन सुध्दा असंख्य कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. 


आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला असताना कारागृह प्रशासनाने कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आलेल्या सर्व कैद्यांना परत कारागृहात हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र यातील काही कैदी परतले, तर एकूण कैद्यांपैकी जवळपास 150 कैदी अजूनही मोकाट फिरत असल्याने नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता पॅरोलवर मोकाट झालेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


दरम्यान नाशिकमध्ये संबंधित कैद्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करून कोणताही प्रतिसाद मिळत नसून सदर आरोपी हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नॉट रीचेबल असणाऱ्या कैद्यांवर त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


नाशिक पोलिसांचे वाढले टेन्शन  
नाशिक मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर सुटलेले अनेक कैदी कुख्यात गुन्हेगार होते. ते तुरुंगात परत न आल्यामुळे पोलिसांचे टेंशन वाढले आहे. शहरांत वाढलेल्या गुन्हेगारी आधीच क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये अशी चिंता नाशिक पोलिसांना आहे.


गायब कैदी शोधण्याचे पोलिसांना आव्हान
दरम्यान सध्या पॅरोलवर बाहेर असलेल्या मात्र आदेश दिल्यानंतरही न परतलेल्या कैद्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे नाशिक शहरात गुन्हेगारी थोपवताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असताना गुन्ह्यात आरोपी असलेल्या कैद्यांना शोधणे मोठे दिव्यच नाशिक पोलिसांसमोर आहे.