Nashik Latest Marathi News : भाले, पट्टे, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनी त्याचबरोबर युद्धशास्र कला आदींचे सादरीकरण नाशिकच्या गोदाकाठावर करण्यात आले. ऐतिहासिक युद्धकला आणि शस्रासांचा याची देही याची डोळा अनुभव नाशिककरांनी घेतला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजच्या चौथ्या दिवशी शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शिवकालीन शस्त्र विद्या व भारतीय व्यायामांचे प्रात्यक्षिके सायंकाळी सहा वाजता आणि शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाडवा पटांगण गोदाघाटावर मांडण्यात आली होती.
दरम्यान ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने शस्त्रास्त्रांची प्रदर्शनी’ मांडण्यात आली होती. या शस्त्र प्रदर्शनात भाल्यांचे विविध प्रकार, पट्ट्यांचे विविध प्रकार, तलवारींचे विविध प्रकार, कुऱ्हाडीचे विविध प्रकार, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली हे प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता पार पडले. तर सायंकाळी सहा वाजता, महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ ही कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थ्यांनी सादर केली.
त्यानंतर भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण सुरु झाले, त्यात सुरुवातीला सर्वांगसुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमीनमस्कार, चंद्रनमस्कार, भारतीय दंड - बैठक सादर करण्यात आली त्यानंतर शस्त्र विद्येच्या प्रत्याक्षिकांमध्ये भारतीय युद्धशास्त्र भूमिका, युद्धकला प्रात्यक्षिके व समारोप भूमिका सादर करण्यात आली.
सलग तीन दिवस विविध कार्यक्रम
पहिल्या दिवशी महावादन आयोजित करण्यात आले होते. यात दीड हजारहून अधिक कलाकारांनी सहभाग घेत ढोलवादन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंतर्रनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी तबला वादन केले. तर तिसऱ्या दिवशी 25 हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी साकारण्यात आली. त्यानंतर आज चौथ्या दिवशी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनी भरविण्यात आली. उद्या पाचव्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.