Nashik News : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे पहिल्यांदाच नाशिक (Nashik Tour) दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे नाशिक शहर प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. आज बुधवारी रोजी बैस हे त्र्यंबकसह शहरातील विविध संस्थांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या सकाळी दहा वाजेपासून बैस हे नाशिकमध्ये असल्याने नाशिक जिल्हा प्रशासनकडून सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. 


महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत आहेत. उद्या बुधवारी सकाळी ते मुंबईहून (Mumbai) नाशिकला रवाना होणार असून नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. राज्यपाल पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर रमेश बैस हे पहिल्यांदाच नाशिकला येत आहेत. प्रशासन आतापासूनच कामाला लागले असून राज्यपाल रमेश बैस यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालय तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सोहळ्यांना ते उपस्थित राहणार आहेत.


दरम्यान राज्यपाल बैस यांचे सकाळी सपकाळ नॉलेज हब हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे दर्शनासाठी रवाना होतील. त्यानंतर ते पहिने (Pahine Village) गावातील जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमस्थळी हजेरी लावणार आहेत. याठिकाणी शाळा, वाचनालयाला ते भेट देणार आहेत. कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा ते सपकाळ नॉलेज हब येथे रवाना होणार असून तेथून हेलिकॉप्टरने नाशिक शहरातील पोलिस कवायत मैदानावर त्यांचे आगमन होणार आहे. तेथून ते शासकिय विश्रामगृहाकडे रवाना होतील. यानंतर कालिदास कलामंदिरात (Kalidas Kalamandir) नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने होणाऱ्या सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक पोलिस वाचनालयातील औरंगाबाद सभागृहात होणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यानंतर ते काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी रवाना होतील. तेथून पुन्हा मोटारीने पोलिस कवायत मैदानावर पोहचून हेलिकॉप्टरद्वारे शिर्डीकडे प्रस्थान करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पहिने गावासह शहरातदेखील जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला.


पहिने गावाला भेटीचं विशेष कारण


दरम्यान राज्यपाल रमेश बैस हे नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर ते पहिल्यांदा त्र्यंबक तालुक्यातील पहिने गावी भेट देणार आहेत. याच कारणही विशेष आहे. त्यामुळे पहिने येथील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालयांसह शासकीय इमारतींना नवे रूपडे लाभले आहे. नव्याने नावे टाकणे आणि चित्रे काढण्याची कामे सुरू आहेत. गावातील पडक्या भिंतींनाही रंगरंगोटी करण्यात येत असून, स्वच्छता, शौचालयांचा वापर, शासनाच्या योजनांचे संदेश रंगवले जात आहेत. प्रभारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांसह सर्व शासन यंत्रणांचे अधिकारी येथे वारंवार भेट देत आहेत. गावात जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. त्याचे काम आता पूर्ण होत आले आहे.