नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी युवक बुडाल्याची घटना घडली होती. त्यातच आज नाशिक मधील गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. तीन वेगवेगळ्या घटनेत पाच जण बुडाले आहेत. चेहेडी संगमेश्वर परिसरात महाविद्यालयीत तरुण बुडाला आहे. दरम्यान पंचवटीत गाडगे महाराज पुलाखाली बुडालेल्या दोघांचा शोध अद्यापही सुरूच आहे. आज दिवसभरात वेगवेगळ्या तीन घटनेतील दोघांचे मृतदेह मिळाले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. शहरातील गोदावरी नदीत (Godawari river) दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन गणेशभक्त बुडाल्याची घटना समोर आली आहे.
नाशिकमध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जवळपास 22 हुन अधिक मंडळ या मिरवणुकीत सहभागी झालेली आहेत. अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शहरातील रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन गणेश भक्त बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे गणेश भक्त विसर्जनासाठी दाखल झाले होते. याचवेळी ते दोघेही बुडाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत या दोघांचाही बचाव पथकाकडून शोध घेतला जात असून बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
तर दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणात परिसरात घडली आहे. वालदेवी परिसरात मित्रांसोबत गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . विशेष म्हणजे यंदा वालदेवी धरण परिसरात विसर्जनासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. तरीदेखील मोठ्या संख्येने गणेश भक्त विसर्जनासाठी दाखल झाले होते आणि अशातच हा अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
नाशिकमधील मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत जाण्याची शक्यता
नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू असून अद्याप मिरवणुकीतील मानाचा गणपती असलेल्या महापालिकेचा गणपती थोड्याच वेळात विसर्जनासाठी गोदागाठावर दाखल होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील गणेश विसर्जन मध्यरात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास देखील गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन तरुणांची हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास शहरात दोघे तर जिल्ह्यात दोघे असे चौघेजण बुडाल्याची घटना घडल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.