Nashik: देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या 135 व्या पुण्यतिथी निमित्ताने सटाणा मध्ये यात्रोत्सव संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर 20 हजाराहून अधिक भाविकांनी उपस्थिती असून आज रथोत्सवाला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराचे ग्रामदैवत असलेल्या देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास आजपासून विविध कार्यक्रमांनी उत्साहात प्रारंभ झाला. या निमित्ताने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यभरात अनेक भागात यात्रा आयोजित केल्या जातात, मात्र ही यात्रा जवळपास पंधरा दिवस असते. त्यामुळे राज्यभरातून भाविक या यात्रेला हजेरी लावतात. दरम्यान आजपासून यात्रेला प्रारंभ झाला सायंकाळी मोठ्या उत्साहात रथोत्सवाला सुरवात झाली. यावेळी रथोत्सवावर हेलिकॉप्टच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.


दरम्यान सटाणा पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे चार वाजता सालाबादाप्रमाणे महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. तर पहाटे तीन वाजेपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारुडे, भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणार्या शहनाई व सनई चौघड्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.


त्यानंतर महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त आज सायंकाळी पाच वाजता रथ ओढून चावडी रोडने रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी वारकरी दिंडी, लेझीम पथक, ब्रॉस बँड तसेच हजारो भक्त यात सहभागी झाले होते. परंपरेनुसार देव मामलेदार यांचा रथ पोलिसांच्या हस्ते ओढून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. सुनील मोरे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने रथ यात्रेवर ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. वारकरी दिंडी, देव मामलेदार यांच्या हस्ते धान्य वाटप, प्रभू श्रीराम देखावा, श्री दत्त संप्रदाय आदी जिवंत देखावे सादर करत सटाणा शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी  या रथ यात्रेत सहभागी झाले होते.


रथोत्सव सटाणा शहरातील कॅप्टन अनिल पवार चौक मार्गाने सरकारी दवाखाना, शिवाजी चौक, टीडीए रोड, मल्हार रोडवरून पोलीस चौकी मार्गे सोनार गल्ली, महालक्ष्मी मंदिर मार्गाने रथ यात्रा काढण्यात आली. रथ मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी सडा, रांगोळ्या घालून सजवला होता. तर मिरवणुकी दरम्यान भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी पाण्याची व प्रसादाची व्यवस्था केली होती. या रथोत्सवाला यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने नेत्रदीपक सोहळ्याची अनुभूती आली.


इतर महत्वाची बातमी: 


'Sorry दादा'! भर चौकात बॅनर लावून शिवसेनेच्या नगरसेवकाचा माफीनामा, माजी आमदारांची मागितली जाहीर माफी