Saroj Ahire : नागपूरला (Nagpur) हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु झालंय, मात्र आजचा दिवस गाजवला तो नाशिकच्या (Nashik) आमदार आई सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी. आजच्या दिवशी त्यां आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह विधानभवनात दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी बाळाचे तोंडभरून कौतुकही केले.
आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असून नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार सरोज अहिरे या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधानभवनाची पायरी चढली असून आपल्यासाठी हा सुखदः क्षण असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सरोज अहिरे तसंच त्यांच्या बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर सरोज अहिरे यांनी बाळासोबत विधानभवन गाठलं, या त्यांच्या कर्तव्यदक्षतेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केलं.
नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे आमदार आहेत. आज त्या समृद्धी महामार्गाने प्रवास करत नागपूर हिवाळी अधिवेशनाला हजर झाल्या. विधानभवनात दाखल झाल्यानंतर बाळासोबत आलेल्या महिला आमदाराचे कौतुक झाले. यावेळी त्या म्हणाल्या कि, अडीच महिन्याचा प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही.. म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या. मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे. तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून ते कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे.. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केलं. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी देखील झाल्या.
दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौतुक करताना म्हणाले कि, विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून अधिवेशनाला उपस्थित राहणं आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहात. यावेळी आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हेदेखील यावेळी उपस्थित होत्या.
कोण आहेत आमदार सरोज अहिरे
सरोज अहिरे या नाशिकमधल्या देवळाली मतदार संघाच्या आमदार असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये सरोज अहिरे यांचं नाव घेतलं जातं, मतदारसंघात जनेतशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या ओळखल्या जातात. आमदार सरोज अहिरे यांचे पती नाशिकमधली प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये सरोज अहिरे आणि प्रवीण वाघ यांचं लग्न झालं.