नाशिक : कुठलाही धर्म हा जाती-पातीची किंवा भेदभावाची शिकवण कोणालाही देत नसतो. अशातच धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचा विचार न करता नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगाव येथिल एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना केलीय. विशेष म्हणजे ही स्थापना करण्यापाठीमागील कारणही तसेच आहे.


येवला तालुक्यातील पुरणागाव येथिल रहेमान शेख हा लहानाचा मोठा हा गावातच झाला. फोटोग्राफी त्याचा व्यवसाय आहे. साहजिकच तो सर्वत्र फोटोग्राफीसाठी फिरत असतो. त्यामुळे रहेमान याची बोली भाषाही अस्सल मराठी झाली आहे. त्याला हिंदी बोलण्यास सांगितले तर त्याला व्यवस्थित जमत नाही. अस्सल मराठी पद्धतीने राहणाऱ्या रहेमानच लग्न झाल्यावर त्याला सुरुवातीला दोन मुली झाल्या. त्यामुळे काहीसा नाराज झालेल्या रहेमानने गावातील उजव्या सोंडीच्या सिद्धिविनायक मंदिरात आपल्याला मुलगा होऊ दे असा नवस केला. त्याची विनंती गणराजाने ऐकली आणि त्याला मुलगा झाला,


त्यादिवसापासून रहेमानची गणपती बाप्पावर श्रद्धा जडली. त्यामुळे रहेमानने आपल्या छोट्याशा घरात गणपती बाप्पा आणत त्याची स्थापना करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षापासून रहेमान आपल्या घरात गणेशाची स्थापना करत असून ही परंपरा अखंडपणे सुरु राहणार असल्याचं तो भरभरुन सांगतो. गणेश स्थापना करताना त्याच्या पत्नीची सुध्दा त्याला साथ मिळाली आणि ती सुद्धा तेवढ्याच मनोभावाने सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करण्यात रहेमानसोबत हिरहिरीने भाग घेते. 


घरात गणेश स्थापना करण्यासाठी आपल्याला ना समाजाकडून, ना घरातल्या वडिलधाऱ्यांकडून कोणी विरोध केला. मी सर्वधर्म समभाव समजतो, कोणी कुठेही प्रार्थना करा मला जे आवडले ते मी केले, देव कुठलाही असो तो सर्वत्र सारखाच आहे, अशी भावना रहेमान शेख व्यक्त करतो. खरं तर रहेमान आणि त्याचे आई-वडील याच गावात राहणारे त्यामुळे गावातील त्यांचे प्रत्येकाशी कोटुंबिक संबंध इतकेच नाही तर रहेमान याच्या कुटुंबात अनेक हिंदू पद्धतीचे सोहळे साजरे केले जातात. जेजुरी येथे दर्शनाला जाऊन आल्यावर घरी जागरण-गोंधळ सुद्धा घातला जातो. नंतर लंगर सुध्दा रहेमान आपल्या हाताने तोडत असल्याचं तो सांगत असतो.