Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एक गाव चर्चेत आले असून या गावाने आमदार, खासदार, मंत्र्यांसह राजकीय पुढाऱ्यांना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या सटाणा (Satana) जवळील मुंजवाड येथील शेतकऱ्यांनी गावाच्या चारही दिशेला 'राजकीय पुढाऱ्यांना मुंजवाड गावात प्रवेश बंद' असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंजवाड (Munjwad) हे गाव चर्चेत आले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न पेटला असून आजच मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी नाफेडमार्फत (NAFED) करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र दुसरीकडे अद्यापही शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी आंदोलन करत आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिक कृषी बाजार समितीमध्ये (Nashik Bajar Samiti) शेतकऱ्यांनी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देत निषेद व्यक्त केला होता. आज नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड गावाने थेट लोकप्रतिनिधींना गावात शिरू न देण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणत्याही राजकीय नेत्यांनी गावात प्रवेश केल्यास कांदा फेकून निषेध केला जाईल व्यक्त असा इशारा देण्यात आला असून अशा आशयाचे फलक मुंजवाड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले आहेत. 


एकीकडे अतिवृष्टी व गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा व शेतीपिकाला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे..अशा परिस्थिती आमदार, खासदार, मंत्री तसेच राजकीय पुढारी हे मात्र शेतकऱ्यांच्या कामी येत नसल्याचा आरोप करीत नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मंजवाड येथील शेतकऱ्यांनी गावाच्या चारही दिशेला 'राजकीय पुढाऱ्यांना मुंजवाड गावात प्रवेश बंद ' असे फलक लावले आहे..दरम्यान, सध्या परिस्थितीला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालाला ही भाव नसल्याने शेतकऱ्यांची आज दैना झालेली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बंदी केल्यास निष्क्रिय ठरलेले राजकीय पुढारी, प्रतिनिधी यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे.अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, राजकीय पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास कांदा फेकून त्यांचे स्वागत केले जाईल.असेही फलकावर शेवटी नमूद करण्यात आले आहे...


जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन 


कांदा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान कांद्यास किमान प्रतिक्विंटल 100 रुपये दर पुकारण्यात आला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत मुंबई-आग्रा महामार्गावर धरणे आंदोलन केले. दरम्यान, शंभर रुपये प्रतिक्विंटलच्या दरानुसार एक रुपये किलोचा भाव मिळाल्याने शेतकरी संतापले होते. चांदवड कृषी उत्पन्न बाजार आवारात कांद्याला शनिवारी किमान शंभर रुपये प्रतिक्विंटल इतका कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच येवला बाजार समिती, लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी निषेद व्यक्त केला आहे.