Nashik Marriage Registration : एकीकडे लग्नाची धामधूम सुरु असून लग्नानंतर (Marriage) विवाह नोंदणी आवश्यक असते. मात्र राज्यभरातील जोडप्यांची विवाह नोंदणी खोळंबल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांपासून विवाह नोंदणी कार्यालयाचे (Registration Office) विवाह नोंदणी संकेतस्थळाच (Marriage Registration Website) बंद असून अनेक नवदाम्पत्यांना विवाह नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.


मार्च एप्रिलपासून लग्न सराई सुरू होऊन जूनपर्यंत लग्नांचा धडाका सुरु असतो. यानंतर सर्वच नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी ही बंधनकारक असते. यासाठी राज्यातील जोडप्यांसाठी महाराष्ट्र्रात एकच विवाह नोंदणी पोर्टल आहे. ज्यावरून विवाह नोंदणीसाठी पूर्व नोंदणी करावी लागते. त्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात पुढील प्रक्रिया करावी लागते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून विवाह नोंदणीची वेबसाईटच बंद असल्याने अनेक जोडप्यांची विवाह नोंदणी खोळंबली आहे. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या इतर अनेक कागदपत्रे काढण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. 


दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून विवाह नोंदणी संकेस्थळ बंद (Website closed) असल्याने नोंदणी विवाह संदर्भातील चलन आणि नोटीसीचे कामकाजच बंद झाल्याने नोंदणी विवाहोत्सुकही खोळंबले आहेत. शासनाने विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण (Computerization of registration process) करून विवाह अधिकार्‍यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हररला जोडली आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊन (Server down) झाले की संपूर्ण यंत्रणाच ठप्प होते. त्याचा फटका नोंदणी पद्धतीने विवाहासाठी इच्छुक असलेल्यांना होतो. 


तीन जिल्ह्यांतच सुरु 


नाशिकमध्ये (nashik) गेल्या मार्च महिन्यांपासून सर्व्हर बंद असल्यामुळे नेांदणीचे कामकाज तूर्तास थांबले आहे. मात्र ज्या जोडप्यांची विवाह नोंदणी मार्चपूर्वी झाली आहे, त्यांची पुढील प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान नाशिक विवाह अधिकारी व्ही डी राजुळे यांनी सांगितले कि, मागील आठ दिवसांपूर्वी अहमदनगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात विवाह नोंदणी सुरु असून येत्या दोन दिवसात साईट सुरु होणार असून संपूर्ण राज्यात विवाह नोंदणी पूर्ववत होईल, असेही ते म्हणाले आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून विवाह पूर्व नोंदणीचे कामकाज ठप्प असल्याने अनेक जोडप्यांनी कार्यालयात विचारणा केली, मात्र त्याबाबतची अनिश्चितता सांगण्यात आल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


येत्या दोन दिवसांत सुरु होईल 


विवाह कायद्याअंतर्गत विवाहाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज (Online application for registration) करण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे विवाहोत्सुकांना घरबसल्या अशाप्रकारची नोंदणी करता येऊ शकते. ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज विवाह नोंदणी कार्यालयाकडे (Marriage Registration Office) दाखल झाल्यानंतर त्यांना मंजुरी देणे आणि चलन काढण्याचे कामकाज विवाह अधिकारी कार्यालयातून केले जाते. परंतु पूर्व नोंदणीच होत नसल्याने पुढील कामकाजाला सर्व्हरचा अडसर निर्माण झाला आहे. मात्र आता विवाह अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात साईट सुरु होणार असल्याचे सांगितल्याने विवाह नोंदणी करणाऱ्या जोडप्यांना दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.