Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या 16 तारखेला नाशिक जिल्ह्यातील येवला दौऱ्यावर येणार आहेत. येवला-लासलगाव मतदारसंघात (Yevala-Lasalgaon Constituency) जरांगे पाटील यांचा सांत्वनपर दौरा आहे. येवला - लासलगाव मतदारसंघ हा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळं मंत्री छगन भुजबळ यांचं टेन्शन वाढणार आहे. 


मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या 16 नोव्हेंबरला नाशिकच्या येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर येत आहेत.  जरांगे पाटील यांचा सांत्वनपर दौरा आहे. येवल्याच्या रस्ते सुरेगाव पासून सकाळी 10 वाजता दौऱ्याला सुरवात होणार आहे. येवला मतदारसंघातील विविध गावांना देखील  मनोज जरांगे पाटील हे भेटी देणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याने जरांगे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार?


येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे मैदानात आहेत. येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे. त्यातच मराठा आरक्षणावरून भुजबळ व जरांगे पाटील हा वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे जरांगे येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील जाहीर सभा घेणार नसले तरी दिवसभर येवला - लासलगाव मतदार संघात फिरणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने जरांगे हे काही राजकीय भाष्य करणार का ? ते मराठा बांधवांना काय संदेश देतात का? हाच खरा प्रश्न असणार आहे.


विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार


विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिंगणातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेण्याची घोषणा केली होती. फक्त एका जातीच्या बळावर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आता मराठा समाजाने आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडावे, असा आदेश जरांगे पाटील यांनी दिला होता. विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मोठे उपोषण सुरू करणार आहेत. या उपोषणामध्ये एक लाखाहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तर उपोषणाला येत असताना  समाज बांधवांनी आपल्याला आवश्यक असणारे सर्व साहित्य घेऊन यावे,  तसेच विशेष करून येत असताना अंथरणे व पांघरण्यासाठी कपडे देखील घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या:


मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा पॅटर्न बदलला, 1 लाख लोकांसह सामूहिक उपोषण, कुणाला पाडायचं हे सांगितलं