Maratha Reservation नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. काल २६ जानेवारी रोजी त्यांनी वाशीत भव्य जाहीर सभा घेतली. त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर संवाद साधला होता. या चर्चेतही अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटलांनी आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या सगळ्या मागण्यांबाबत मनोज जरांगेंनी शासननिर्णय आणि लिखित पत्रे घेतली आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. वाशी नवी मुंबई या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडत आहे. 


नाशिकहून मराठा कार्यकर्ते मुंबईकडे रवाना


या विजयी जल्लोषात सहभागी होण्यासाठी नाशिकच्या मनमाडहून मराठा कार्यकर्ते पंचवटी एक्स्प्रेसने रवाना झाले आहेत. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.


आंदोलन संपलं नसून, सध्या स्थगित करण्यात येतंय


आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी माझ्या समाजाने खूप संघर्ष केला. आरक्षण मिळत कसं नाही यासाठी शेवटी आम्हाला मुंबईत यावं लागलं. मराठे एवढ्या ताकतीने मुंबईत आले की, या ताकतीमुळेच आज आदेश निघाला आहे. अन्यथा हा आदेश निघाला नसता. मराठे चारही बाजूंनी मुंबईत घुसू लागले आणि सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आंदोलन संपले नसून, आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलंय


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. समाजाला मी मायबाप मानले आहे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द


मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारकडून तसा अध्यादेश सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वाशीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातानं मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द केला आहे. अध्यादेश देताना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची गळाभेट घेतली.