Nashik Air service : नाशिकच्या (Nashik) विमानसेवेला पुन्हा बूस्ट मिळणार असून आता विमानसेवेतील महत्वाची कंपनी असलेल्या इंडिगोने याकरता गुरुवारी (2 फेब्रुवारी) रात्रीपासून तिकीट बुकिंग सुरु केले आहे. त्यामुळे नाशिककरांचा प्रवास आणखी वाढणार आहे. 


किफायतशीर तिकीट दर


नाशिक विमानसेवा (Nashik Air Service) मागील काही महिन्यांपासून अस्थिर असल्याचे चित्र आहे. अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाठपुरावा करुन विमान कंपन्यांना सेवा सुरु ठेवण्यासाठी साकडे घातले जात आहे. याच अनुषंगाने आज शुक्रवारी (3 फेब्रुवारी) नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन यांची संयुक्त बैठक इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने तिकिटांचे दर अत्यंत किफायतशीर ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिकीट बुकिंग सुरु होऊ शकते हे देखील यात स्पष्ट करण्यात आले होते. गुरुवारी प्रत्यक्ष तिकीट बुकिंग करण्यात सुरु झाले आहे. सुरुवातीला इंडिगोच्या अधिकृत वेबसाईट आणि एजंट यांच्या संकेतस्थळावर ते बुकिंग सुरु झाले असून आजच्या बैठकीनंतर स्थानिक ट्रॅव्हल एजंटकडे देखील ते उपलब्ध होऊ शकणार आहे.


तर दुसरीकडे नाशिककरांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. नुकताच नाशिक ओझर विमानतळावरुन हैदराबादला जाणारी स्पाईस जेटची फ्लाईट सकाळी 8 वाजता येणे अपेक्षित होते. मात्र सुरुवातीला अर्धा तास नंतर एक तास विलंब सांगता सांगता अखेरीस दुपारी 12 वाजता हे विमानच रद्द झाल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. एका प्रवाशाला तर अंत्यसंस्कारासाठी वेळेत पोहोचायचे होते. मात्र, त्याला जाता न आल्याने त्याने हळहळ व्यक्त केली.


अंत्यसंस्कारासाठी वेळेत पोहोचायचे होते...


ओझर विमानतळावर गुरुवारी हा प्रकार घडला. सध्या विमानतळावरुन स्पाईस जेटच्या दिल्ली आणि हैदराबाद सेवा सुरु असून त्यामुळे तेवढाच एक आधार प्रवाशांना आहे. मात्र, या कंपनीचे विमान कधी उशिरा तर कधी थेट रद्दच होत असल्याने प्रवाशांना कामे रद्द करावी लागतात. महत्त्वाच्या कामांना वेळेवर पोहचता येत नसले तर काय उपयोग असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता ओझर विमानतळावरुन हैदराबादला विमान जाणार होते. त्यासाठी नियमानुसार प्रवासी वेळेत पोहोचले होते. मात्र विमान विलंबाने येईल असे प्रशासनाकडून प्रवाशांना सांगण्यात आले. सुरुवातीला अर्धा तास, नंतर एक तास असं करत करत बारा वाजले. शेवटी दुपारी 12 वाजता हे उड्डाणच रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला, त्यानंतर कंपनीकडून तिकिटाचे पैसे परत दिले गेले तरी वेळेत न पोहोचल्याने रद्द झालेल्या विमान विलंबाने येईल असे कामांचे काय असा प्रश्न करीत कंपनीकडून सांगण्यास सुरुवात झाली.