Balasaheb Thorat : महिना होत आला तरी अद्यापही मंत्रिमंडळ नाही. आता तरी मंत्रिमंडळ (Cabinet) होणार का असा सवाल करीत मंत्र्यांचे अधिकार सचिवांच्या हाती देण्यात आले आहेत. मग मंत्रालय (Mantralay) हे नाव बदलून सचिवालय हे नाव करावं अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. 


नाशिक (Nashik) येथे प्रदेश काँग्रेसच्या (Congress) वतीने घेण्यात येत असलेल्या आझादी गौरव पदयात्रेच्या (Azadi Gaurav Padyatra) माहिती देण्यासाठी बाळासाहेब थोरात हे नाशिकमध्ये आले होते. थोरात यांनी यावेळी शिंदे फडणवीस (CM Eknath Shinde) सरकारवर आगपाखड केली. ते म्हणाले की, महिना उलटूनही राज्यात सरकारने अद्याप मंत्री मंडळ विस्तार केला नाही, तर मुख्यमंत्र्यांचे सतत दिल्ली दौरे होत आहेत. खातेवाटपाच्या घोळामुळेच मंत्री मंडळ विस्तार रखडला असल्याचे ते म्हणाले. 


दरम्यान येत्या 9 ऑगस्ट पासून आझादी गौरव पदयात्रा देशभर सुरू करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामुळेच देशाची प्रगती झाली. रोजगार हमी योजना, बालकांना शिक्षणाचा हक्क, माहितीचा अधिकार, भूसंपादन कायदा हे सर्व युपीए सरकारमध्ये झाले. मात्र सध्याचा कालखंड बदलला, महागाई वाढली, सर्वसामान्य जगणं कठीण झाले आहे. धान्य, पीठ, दूध दही पर्यंत कर लावला जात आहे. लोकशाही राहणार का? संविधान टिकणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून सगळीकडे दबावाचे राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 


काँग्रेसच्या विचारधारेवर हल्ला
काँग्रेस हा विचार आहे. मात्र सध्या या  विचारधारेवरच हल्ला होत आहे. काँग्रेसचे नरसिंह राव असताना ही अर्थव्यवस्था चांगली होती. स्वातंत्र्य काळात आरएसएस कुठे नव्हते, शाखेवर तिरंगा लावत नव्हते. आता आरएसएसचे विचार सर्वत्र आहेत. येत्या 14 ऑगस्टला भाजप फाळणी वेदना दिन साजरा करत आहे, मात्र हा दिन साजरा करण्याऐवजी महागाई विरोधी दिन साजरा करावा, असा टोला यावेळी थोरातांनी लगावला.


आझादी गौरव पदयात्रा
येत्या 9 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यात स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि सध्याच्या सरकारचे कारभार मांडण्यात येणार आहेत. आत्ताच्या सरकारला विरोध आणि मागील काळात काँग्रेसने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काँग्रेसची पदयात्रा असल्याचे थोरात म्हणाले. 


मंत्रालय नाव बदलावं...
राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता तर मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे मंत्रालयाची पाटी काढून त्याजागी सचिवालयाची पाटी लावावी अशी बोचरी टीका यावेळी थोरातांनी केली.