Sadabhau Khot : आदिवासी विकास विभागामधील सर्व रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Minister Sadabhau Khot) यांची भेट घेतली. आदिवासी विकास विभागातील दहा वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत संरक्षण देऊन समायोजनाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. 


आज मुंबई येथे माजी राज्यमंत्री तथा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत एक बैठक करून सकारात्मक असा निर्णय घ्यावा, अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी मंत्री विजयकुमार गावित यांना केली. आदिवासी विकास विभागातील दहा वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत संरक्षण देऊन समायोजनाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. यासह अन्य काही मागण्या घेऊन आदिवासी विभागाचे रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांचे नाशिक ते मंत्रालय असे पायी चालत आंदोलन सुरु आहे. 


कालपासून नाशिक ते मुंबई अशा मोर्चाला सुरुवात 


विदर्भ आणि खानदेश दौऱ्यावरुन परत येताना सदाभाऊ खोत यांनी मुंबईकडे जात असताना नाशिकमध्ये या विराट मोर्चात सामील झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. आदिवासी विकास विभागाने दिनांक 25 मे 2023 रोजी 10 वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग तीन  वा वर्ग ४ कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊ नये याबाबतचे शासन परिपत्रक काढले आहे. परंतु दहा वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत संरक्षण देऊन समायोजनाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा असे त्यांना अभिप्रेत आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी कालपासून नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयकडे विराट मोर्चा आगेकूच करत आहे. 


आंदोलकांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार 


सदाभाऊ खोत हे देखील या मोर्चातील गावगड्यातील कर्मचाऱ्यांसोबत थोडे पायी चालत त्यांना दिलासा दिला. तसेच सदाभाऊ खोत यांनी आदिवासी मंत्री महोदय यांच्याशी बोलून याबाबत एखादी बैठक तात्काळ लावण्याबाबत देखील विनंती केली आहे. त्यामुळं या आंदोलकांच्या मागण्यांवर सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sadabhau Khot : शेतकरी विरोधी कायद्यांमुळं विकासाला खीळ, सदाभाऊ खोतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; वाचा नेमक्या मागण्या काय?