नाशिक : आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा मुलगा दीपक बडगुजर (Deepak Badgujar) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik Crime News) मोठी खळबळ उडाली असून गोळीबार प्रकरणातील आरोपीने आता पोलिसांवर (Nashik Police) गंभीर आरोप केला आहे.  


आरपीआयचे नाशिक महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांच्यावर तीन वर्षांपूर्वी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील संशयित आरोपी अंकुश शेवाळे याने पोलिसांवरच आरोप केल्याने चर्चांना उधाण आले आहे.   


पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप


गोळीबार प्रकरणातील ताब्यात घेतलेला संशयित आरोपी अंकुश शेवाळेची आज नाशिक जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप अंकुश शेवाळेनी केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याचे नाव घेण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचे शेवाळेनी म्हटले आहे.  सुधाकर बडगुजर हे अंकुश शेवाळे याला भेटण्यासाठी गेले असताना सुधाकर बडगुजर यांना आरोपीने हकीगत सांगितली. 


अंबड पोलिसांच्या कामकाजावर संशय : सुधाकर बडगुजर


मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेतलेल्यांना मारहाण करण्यात येत होती. सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना मारहाण केली. जुने नाव घेतले त्यांची सखोल चौकशी करा. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आम्हाला त्रास देण्याचे काम केले. पवननगर येथे झालेल्या गोळीबारात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अंबड पोलिसांच्या कामकाजावर मला संशय वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात षडयंत्र


दरम्यान, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता गाकवाड म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात षडयंत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात तडीपारी करण्यात आले. पोलीस प्रशासन हेतू पुरस्कर त्रास देत आहे. जाधव गोळीबार प्रकरणात बडगुजर परिवाराला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत. निवडणुकीच्या काळात अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Sanjay Raut : बडगुजर कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव; संजय राऊतांचा गंभीर आरोप