Nashik Politics : राज्यातील शिवसेनेमध्ये (shivsena) फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील दोन आमदार आणि खासदार हे शिंदे गटात गेले होते. आता राष्ट्रवादीचे बडे नेते असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत गाठ बांधल्याने तीसहून अधिक आमदार अजित पवारांसोबत सामील झाले आहेत. यात नाशिकच्या सहाही आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे. 


राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड काल अवघ्या महाराष्ट्राने (Maharashtra Politics) पाहिली. याआधीच एकनाथ शिंदे (Eknath shinde) शिवसेनेतून बंड करत देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) नवं सरकार स्थापन केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी फुटून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) अनेक नेते उपस्थित होते. यात शरद पवार यांचे जवळचे नेते नरहरी झिरवाळ (Narhri Zirwal) हे देखील उपस्थित होते. तसेच शरद पवार यांना वडिलांसमान मानणाऱ्या सरोज अहिरे या देखील उपस्थित होत्या. नाशिकमधील इतर राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित नसले तरीही ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबत इतर नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नाशिकमधून (Nashik) नरहरी झिरवाळ आणि सरोज अहिरे या उपस्थित होत्या. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असून यापैकी शपथविधीला तिघेजण उपस्थित होते. तर माणिकराव कोकाटे, दिलीप बँकर, नितीन पवार मुंबईला लागलीच रवाना झाले होते. मात्र या सर्वजण अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात येते आहे. माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक असून त्यांची आमदारकीची चौथी टर्म आहे. 1999 साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांची घौडदौड सुरूच होती, नंतरच्या काळात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत चौथ्यांदा आमदार झाले. 


राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेले नरहरी झिरवाळ तर पहिल्यापासून चर्चेत आहेत. अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पहाटेच्या शपथविधीला देखील हजर होते. तर आता ते 2020 पासून विधानसभा उपाध्यक्ष सांभाळत आहेत. त्यानंतर आता झालेल्या राजकीय घडामोडीत देखील ते अजित पवार यांच्यासमवेत असल्याने ते त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट आहे. मात्र आता त्यांच्या विधानसभा उपाध्यक्ष पदाचे काय? असं प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यानंतर दिलीप बनकर हे देखील राष्ट्रवादी पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. त्यांनी जवळपास वीस वर्षांपासून पिंपळगाव बाजार समितीचे सभापती भूषवत आहेत. 


तसेच कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार तर सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्या अनेक कार्यक्रमांना ते हजर राहत आले आहेत. त्यांची हि तिसरी टर्म असून पहिल्यापासून जनमानसात जाऊन काम करण्याची पद्धत लोकांना भावत असल्याने लोकांचा पाठिंबा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे त्यांच्या वहिनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार ह्या आहेत. त्याचबरोबर आता नितीन पवार हे देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याने सरकारमध्ये सामील झाले आहेत. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बहुचर्चित आमदार सरोज आहिरे या देखील अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. देवळाली मतदारसंघात तीस वर्षे शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांहे वर्चस्व होते. हे वर्चस्व मोडीत काढत सरोज अहिरे यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे शरद पवार यांना वडिलांसमान मानणाऱ्या अहिरेंनी देखील अजित पवार यांची साथ दिली आहे. सरोज अहिरे यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला शरद पवार नाही म्हणत नाहीत, असा इतिहास आहे.