Nashik Incident : सध्या आंब्यांचा सीज़न आहे. बाजारात असंख्य आंबे विक्रीसाठी आलेले आहेत. मात्र अनेकजण झाडावरून आंबे पाडण्यासाठी जात असतात. अशावेळी अनेकदा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याचेच उदाहरण नाशिक शहरात घडले आहे. 


नाशिक शहरातील इंदिरानगरमध्ये आंबे पाडत असताना विजेचा धक्का लागल्याने युवकाला प्राण गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिरुद्ध अनिल धुमाळ (३०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हा तरुण सकाळी सात वाजेच्या सुमारास घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. यावेळी त्याने आंबे पाडण्यास सुरवात केली. 


दरम्यान काही आंबे उंचावर असल्याने त्याने एका लोखंडी पाईपच्या साहाय्याने आंबे पाडण्याचे ठरविले. त्याने लोखंडी पाईपने आंबे पाडण्यास सुरवात केली. मात्र आंब्याच्या झाडाजवळून विजेची तार गेली होती. त्या तारेला लोखंडी पाइप लागल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायाला, पोटाला दुखापत झाली. 


यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनिरुद्धच्या वडिलांनी उपचारासाठी त्याला नजीकच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. सदर घटनेची इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनिरुद्ध हा सॉफ्ट्ववेअर इंजिनिअर होता. त्याच्या अचानक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. 


विजेचा शॉक लागल्यानंतर.... 


एखाद्या व्यक्तीस शॉक लागलाच तर संबंधित वीजपुरवठा ताबडतोब बंद करावा. ते शक्य होत नसेल तर त्या माणसाला दूर करण्याअगोदर स्वत:ला वीजविरोधक बनवून घ्यावे- म्हणजे एखाद्या लाकडी वस्तूवर किंवा कोरडा लोकरी कपडा, रबरी मॅट म्हणजेच कोणत्याही वीजरोधक वस्तूवर उभे राहावे आणि लाकडी दांडा किंवा तत्सम वस्तूचा वापर करून त्या माणसाला विजेच्या स्पर्शापासून दूर करावे. 


अन्यथा, तुमच्याही शरीरातून वीज प्रवाह वाहून तुम्हालाही शॉक लागू शकेल; असे न केल्यामुळे एकास वाचविताना सोडवणाऱ्याला अनेक वेळा शॉक बसले आहेत. हे झाल्यानंतर अपघातग्रस्ताला सरळ निजवून त्याच्या तोंडात आणि घशात बोटे घालून तंबाखू, नकली दात किंवा इतर वस्तू असल्यास त्या काढून टाकाव्यात. त्या व्यक्तीच्या हृदयाचे स्पंदन बंद पडल्यास अथवा कमी झाल्यास त्यास कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची व्यवस्था करावी.