Nashik Water Issue : अवघ्या नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाशिक मनपा हद्दीतील तिरडशेत हे गाव तहानेने व्याकुळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर संतापलेल्या महिलांनी रास्ता रोको करत आपला आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे मनपा हद्दीत असून 'पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 


नाशिक शहराला (Nashik City) पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला लागून असूनही, नाशिक महानगरपालिका (Nashik Muncipal Corporation) हद्दीतील तिरडशेत या गावातील नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती तिरडशेत येथे निर्माण झाली आहे. याचाच निषेध करण्या करिता हजारो महिलांनी रस्त्यावर उतरत हंडा मोर्चा काढला. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको करत पाणी प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. 


एकीकडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना मनपा हद्दीतील गावात पाणीटंचाईचा प्रश्न पुढे आला आहे. नाशिकपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तिरडशेत गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. सध्या सात ते आठ दिवसानंतर मनपाचे पाणी येते. मात्र अनेकदा येथील महिलांना पिंपळगाव बहुला येथे पाणीसाठी धावाधाव करावी लागत आहे. यासाठीचा संताप उफाळून आल्यानंतर आज महिलांनी रास्ता रोको करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. 


अधिकाऱ्यांची धावाधाव 
काही वर्षांपासून तिरडशेत येथे पाण्याची समस्या आहे. त्यामुळे येथील महिला जवळील पिंपळगाव बहुला येथे पायपीट करून पाणी आणतात. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आज सकाळी गावातील महिलांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. पाण्याचा प्रश्न सुटत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला. दरम्यान प्रशासनाने याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आहे. 


नाशिक-त्र्यंबक रस्ता जॅम 
गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने महिलांचा संयम सुटला आहे त्यामुळे त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने अनेकांचे नियोजन यावेळी कोलमडले.