Nashik Kalicharan Maharaj : अकोल्याचे कालिचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी नाशिकमध्ये इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कालीचरण महाराज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी 'इस्लाम धर्मच नाही' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कालिचरण महाराज नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी नाशिक येथील ग्रामदैवत असलेल्या भद्रकाली देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी ते म्हणाले कि, हिंदूंची पाच लाख प्रार्थना स्थळे फोडण्यात आली आहेत. ती परत मिळवणे गरजेचे आहे. यासाठी मोदी, शहा, योगी देशाला तारतील, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानचं करण्यात येईल. तसेच शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे. पण सोशल मीडियामुळे सर्वच जण बघत आहेत, असं ते म्हणाले.
इस्लाम हा धर्मच नाही.. यावेळी इस्लाम धर्माविषयी बोलताना ते म्हणाले कि, 'इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे', हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकतं. म्हणून मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे, जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोण आहेत 'कालीचरण महाराज'
'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचं मुळ नाव 'अभिजीत धनंजय सराग'. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्यांचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' संबोधनं सुरू केलं. मात्र, 'कालीचरण महाराज' स्वत: आपण महाराज नव्हे तर 'कालीमाते'चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतात.