Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) देवळा तालुक्यातील (Deola Taluka) लोहणेर येथील एका रुग्णालयातील वार्ड बॉयने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


देवळा येथील इंद्रायणी क्लिनिकचे संचालक डॉ. संजय आहिरे यांच्या दवाखान्यात वार्डबॉय म्हणून कार्यरत असलेल्या विकास भगवान सोनवणे या तरुणाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दवाखान्यातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत देवळा पोलिसात (Deola Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील डॉ. संजय आहिरे यांच्या दवाखान्यात विकास भगवान सोनवणे हा तरुण वार्ड बॉय म्हणून काम करीत होता. त्याचबरोबर महाविद्यालयात शिक्षण घेत दवाखान्यात वास्तव्यास होता. रविवारी रात्रीचे जेवण करून तो झोपण्यासाठी गेला. सोमवारी सकाळी तो लवकर न उठल्याने त्यास आवाज दिला. मात्र सदर खोलीचे दरवाजे आतून बंद असल्याने खोलीच्या खिडकी उघडून पाहिले असता विकास सोनवणे याने नॉयलॉन दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 


याबाबत देवळा पोलीस ठाण्यात येथील पोलीस पाटील अरविंद उशीरे यांनी खबर दिली. देवळा पोलिस ठाण्याचे पी. एस. आय. पुरुषोत्तम शिरसाठ, ए. एस. आय. विजय देवरे, चंद्रकांत निकम, घटनास्थळी तातडीने हजर झाले. घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण मात्र निश्चित कळू शकले नाही. शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी मयत विकास सोनवणे यांच्यावर लोहोणेर अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत विकास सोनवणे यांचे पशाच्यात आई, दोन मोठे भाऊ, भाऊजयी असा परिवार आहे. 



आत्महत्येचे कारण अस्पष्ट 
दरम्यान देवळा तालुक्यातील वार्डबॉयने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. विकास हा महाविद्यालयीन शिक्षणासह नोकरीही करत होता. मात्र अचानक त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


तरुणांमध्ये वाढते प्रमाण 
अलिकडच्या काळात तरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. रोज शहरात किंवा जिल्ह्यात एक किंवा आत्महत्यांच्या घटना उघडकीस येतात. सध्या शारीरिक व मानसिक व्याधींमुळे अनेकदा आत्महत्या घडताना दिसत आहेत. विशेषतः आत्महत्या करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे नैराश्य असते. नैराश्यात असलेल्या रुग्णांमध्ये आत्महत्या करण्याची लक्षणे जास्त असतात. या व्यतिरिक्त दारूचे सेवन आणि इतर सामाजिक समस्यांमुळेही आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण आहे; परंतु नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे 20 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तिंमध्ये आत्महत्येचे विचार जास्त येतात. या व्यक्तींना समुपदेशनाची गरज असल्याचे तज्ञ सांगतात.