Nashik News :  जीवनात एखादी केलेली चूक किंवा गुन्ह्यांमुळे तुरुंगात जावे लागलेल्या लोकांकडे समाज कायम गुन्हेगार या नजरेतून पाहत असतो. या गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यासाठी तुरुंग प्रशासन देखील या कैद्यांसाठी काही उपक्रम आयोजित करत असते. असाच एक वेगळा प्रयोग नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आला. संत तुकाराम महाराज यांच्या नावाने कैद्यांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन कारागृहात करण्यात आले होते. 


शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, यांच्यावतीने संत तुकाराम महाराज यांच्या नावाने कैद्यांसाठी राज्यस्तरीय भजन,आणि अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नाशिकच्या कैद्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत कैद्यांनीच भजनं गायली आणि त्यांना सांगितीक साथही कैद्यांनीच दिली आहे. तसेच अध्यात्माच्या माध्यमातून संतांनी जे शिकवले आहे, त्यामुळे कारागृहातील कैद्यांना भविष्यातील आयुष्य जगण्यासाठी ते उपयुक्त ठरतील असा या स्पर्धेचा हेतू असल्याचे स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.


कमलाबाई धारिवाल यांच्या स्मरणार्थ संघांना दिना आणि प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते हार्मोनियम, तबला, पखवाज, दहा जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची प्रतिमा आणि 82 पुस्तकांचा संच देण्यात आला. तर अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघ ज्ञानोबा-तुकाराम करंडक आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करंडक, तृतीय क्रमांकास संत शेख महंमद करंडक देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदी जणांना संदीप महाराज रायते व संगीत शिक्षक आनंद अत्रे यांनी प्रशिक्षण दिले. 


दरम्यान शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास महाराष्ट्रातील सर्वच कारागृहात हा प्रयोग करण्यात आला. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी अजित पवार उपस्थित होते म्हणाले होते कि, 'कैंद्याची ज्यावेळी शिक्षा संपते, त्यावेळेस तुरुंगातून बाहेर पडत असताना आपण केलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त व्हावे, यासाठी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांनी अभंग, किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून विचार सांगितलेले आहेत. त्यामुळे कैद्यांनी अशाप्रकारची चांगली पुस्तके वाचली आणि आपल्या विचारात बदल घडवला तर, निश्चितपणे बदल होईल. 


यावेळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ म्हणाले कि, अध्यात्माने प्रबोधन समाजपरिवर्तनाच्या गावापासून अभंग भजन स्पर्धेमुळे बंदी जणांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येईल, आतापर्यंत पंधरा कारागृहातील वातावरण पाहिल्यानंतर मनाला शांती देणारा हा उपक्रम असाच कायम चालू राहावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्पर्धेच्या निमित्ताने नामस्मरणातून समाधानही आयुष्यभर कायम राहील अशी प्रतिक्रिया विक्रम पठाण यांनी व्यक्त केली. कारागृहात संतांचे नामाचे स्मरण हा बंदी जनांसाठी अविस्मरणीय योग असल्याच्या भावना भगवान सोळुंके या बंदीवानाने आपल्या शब्दांत व्यक्त केल्या.