SSC Results 2022 : प्रत्येक वेळी परिस्थिती आपलं यश ठरवत नसते, अनेकदा आपली मेहनत, जिद्द आणि काहीतरी करण्याची धडपड माणसाला यशस्वी करत असते. तसेच शिक्षणाची गोडी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी शिखर गाठता येते. याची प्रचिती बर्फ गोळा विक्री करून वडिलांना आधार लावत दहावीच्या परीक्षेत अव्वल येण्याचा मान चैतन्य सोमनाथ भुरे या विद्यार्थ्यांने मिळवला आहे. या विद्यार्थ्याला यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 81 टक्के पडले आहेत. 


आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. काही विद्यार्थ्यांनी गरीबीवर मात करून परीक्षेत यश संपादन केलं आहे. अशीच चैतन्य भुरे याची जिद्दीची कहाणी. नाशिकच्या गोदाकाठावर आपल्या राबत्या हातानी नाशिककरांना साखर खाऊ घालणारा चैतन्य भुरे हा दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.


चैतन्य सोमनाथ भुरे हा नाशिकमधील आरके परिसरात राहायला असून घरची परिस्थिती ही बेताची आहे. त्याचे वडील गेल्या 25 वर्षांपासून गोदाकाठावर बर्फ गोळा विक्रीचे काम करूनआपल्या संसाराचा गाडा ओढतात. मात्र मध्यंतरी कोरोना काळात सर्वच बंद असताना बर्फ गोळा तरी कसा चालू राहील. विवंचनेत असताना दोघा बाप लेकांनी काहीतरी विक्री करून गरज भागवली. तर परीक्षा सुरु होण्याच्या काळात चैतन्य बर्फ गोळा विकत होता. तर ग्राहक नसताना एखाद पानही वाचायचा. असा त्याने दहावीचा अभ्यास केला. त्यामुळे चैतन्य आपले शिक्षण घेत बाबांबरोबर बर्फ गोळा विक्री करायला मदत करतो. जेव्हा वेळ असेल गाडी उभे राहून काम करणे, उरलेल्या वेळात अभ्यास करणे असा त्याचा दिनक्रम असतो.


कुठेही न डगमगता, न घाबरता हे तो काम करत होता आणि घर चालवण्यासाठी काम करत होता. त्यामुळे पंचवटी परिसरात अनेक जण त्याला ओळखू लागले. याच चैतन्यने दहावीच्या परीक्षेत 81 टक्के गुण प्राप्त केले आहे. त्यामुळे तो खुश झाला आहे. पुढे जाऊन तो कॉमर्स शाखेत प्रवेश घेणार असून करिअर म्हणून त्याने व्यवसाय करण्याचा मानस आहे. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पेठे हायस्कूलमधून शिक्षण
दरम्यान पेठे हायस्कूलमधून दहावीचे शिक्षण घेणाऱ्या चैतनने स्वतः बर्फाचे गोळे विकून परीक्षेचा अभ्यास करत 81 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाने त्याच्यावर शैक्षणिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर होताच भुरे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 


असा केला अभ्यास 
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी वडिलांबरोबर बर्फ गोळा विकून अभ्यास केला. सकाळी 11 ते दुपारी 3 अशी शाळा व त्यानंतर सायंकाळी पाच ते रात्री गाडीवर थांबून त्यानंतर रात्री घरी गेल्यावर दैनंदिन अभ्यास करून चैतन्याने परीक्षा दिली आणि ८१ टक्के गुण मिळवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. चैतन्यने शालेय शिक्षणासोबत ढोल वादनाचा छंदही जोपासला आहे. तर गेल्या तीन-चार वर्षांपासून तो  स्वतः बर्फ गोळा विक्री करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहे.