Dilip Khandavi : देशातील पहिल्या अल्टिमेट खो खो (Altimet Kho Kho League) लीगसाठी जगन्नाथ ओडीसा या संघातून श्रेणीमध्ये अष्टपैलू खेळाडू दिलीप खांडवी (Dilip Khandvi) याची निवड झाली आहे. राज्य शासनाचा वीर अभिमन्यू पुरस्काराने सन्मानित दिलीपच्या लेख मधील निवडीने राष्ट्रीय खो खोमध्ये नाशिकच्या (Nashik) शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. 


खो खो हा मर्दानी खेळ लवकरच मोठ्या मैदानावर पहायला मिळणार असून पुण्यात (Pune) पहिलीवहिली अल्टिमेट खो खो -2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या वहिल्या मौसमासाठी सहा फ्रँचाइजींच्या वतीने झालेल्या चाचणीतून एकूण 143 खेळाडूंची निवड करण्यात आली. डाबर इंडिया समूहाचे (Dabour India Group) अध्यक्ष अमित बर्मन आणि भारतीय खो खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या या स्पर्धेला पुण्यात येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा येत्या 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेत सुरगाण्याचा दिलीप खांडवी याची निवड करण्यात आली आहे. 


नाशिकचं नव्हे तर महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून आपल्या खेळाची चुणूक दिलीप खांडवीने दाखवली आहे. याचेच फलित म्हणून त्याची या स्पर्धेत निवड झाली आहे. मूळचा सुरगाणा तालुक्यातील कृष्णानगर (काठीपाडा) येथील रहिवासी असलेल्या दिलीपची उंची तशी सामान्य खेळाडूंच्या तुलनेत कमी आहे मात्र त्याचा धावण्याचा प्रचंड वेग आणि अचूक संतुलनाच्या बळावर त्याने आतापर्यंत 14 आणि 18 वर्षाखालील संघटनेच्या स्पर्धांमध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. 


दिलीप खांडवी यांनी सहारा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पाच सुवर्णपदक पटकावले आहेत. तसेच एका राष्ट्रीय स्पर्धेत देशातील सर्वोत्तम खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार देखील त्याला मिळालेला आहे. त्याच्या निवडीबद्दल जिल्हा खोखो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, कार्याध्यक्ष आनंद गारमपल्ली, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. खो-खो मध्ये त्याला प्रशिक्षक आणि मार्गदर्शक मंदार देशमुख उमेश आटवणे व गीतांजली सावळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथमच होणाऱ्या लीगमध्ये दिलीपची झालेली निवड त्याच्या सर्वोत्तम खेळावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. 


दरम्यान दिलीप खांडवी हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी केलेली आहे. 17 व 19 वर्षाखालील शालेय राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजय चौदावा अठरा वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उपविजयी. चौदावा अठरा वर्षाखालील राज्य अजिंक्य स्पर्धेत सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. 19 वर्षाखालील जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक व सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड, 18 वर्षाखालील दोन राष्ट्रीय अजिंकपद स्पर्धेत सुवर्णपदके, वीर अभिमन्यू पुरस्कार, 17 व 21 वर्षाखालील खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक. 


आतापर्यंतची कामगिरी 
जम्मू-काश्मीरला झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत ही सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा किताब पटकावला आहे. उस्मानाबादला झालेल्या सतरा वर्षांवरील शालेय खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिक जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळा नेतृत्व करीत पुणे विभागाला पराभूत केले होते. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकासह वीर अभिमन्यू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.