Nashik Crime : नाशिक शहरातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. काल मध्यरात्री पुन्हा एक खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष हि घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मोटरसायकलवर आलेल्या तघे जण या दृश्यात दिसत आहेत.
नाशिक शहर पर्यटनाचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडच्या शहराला गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाल्याने शहराची ओळख जाणून बदलत चालल्याचे चित्र आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले, तरी गुन्हेगारीचा शहरातील आलेख अद्यापही चढताच आहे. काल (दि. १९) रोजी सकाळी म्हसरूळ परिसरात एका युवकाची धारदार शस्राने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री शहरातील पूर्णिमा बस स्टॉप जवळ खून झाल्याची घटना घडली आहे.
हरीश पटेल असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सदर इसम पुण्याचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून तो नाशिक शहरात कामानिमित्त आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. मात्र रात्रीच्या सुमारास पूर्णिमा बस स्टॉप जवळून जात असताना अज्ञात हल्लेखोर सदर इसमावर हल्ला करून पसार झाले. दरम्यान लुटमारीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, आचल मुदगल घटनास्थळी तपास करीत आहेत.
दरम्यान अवघ्या २४ तासांत नाशिक शहरात दुसरी हत्या घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे पोलीस आयुक्त गुन्हेगारी थोपवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतांना अशाप्रकारे भाडभीड न बाळगता सर्रास दिवसाढवळ्या खून होत असल्याने पोलिसांचा धाक गुन्हेगारांना आहे कि नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुन्हेगार सुधार योजना?
माजी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुन्हेगार सुधार योजना सुरु केली. ही बाब नाशिककरांसाठी सुखद धक्का देणारी असली तरी या योजनेतून गुन्हेगारांच्या तुलनेत किती गुन्हेगारांनी सरळ मार्ग स्वीकाराला. उर्वरित गुन्हेगार सुधारण्याऐवजी आणखीच बिघडत असल्याचे आजवरच्या घटनांवरुन समोर येत आहे. तर दुसरीकडे खून, दरोडे, बलात्कार आदी गंभीर स्वरुपाच्या खुन्यातील सराईत गुन्हेगारांना औरंगाबाद, पुणे , ठाणे व मुंबई येथील पोलीस दोन वर्षांसाठी तडीपार करतात. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार नाशिक शहर व जिल्ह्यात आश्रयास येत आहेत. तडीपार सराईत गुन्हेगार नाशिकमध्ये आल्यावर ते स्थानिक गुन्हेगारांशी हातमिळवणी करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी अधिकच वाढत चालल्याचे अलीकडच्या घटनांवरून लक्षात येते.