Hanuman Birth Place Controversy : नाशिकच्या हनुमान जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला असून आता याविरुद्ध नाशिकचे साधू महंत एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दाव्यानंतर हा वाद पेटला आहे. गोविदानंद महाराजांनी याबाबत नाशिकच्या साधू महंतांना जन्मस्थळ सिद्ध करण्या संदर्भात खुले आव्हानही दिले. या आव्हानचा स्वीकार करीत नाशिकच्या साधू महंतांसह गावकरी एकत्र झाले असून सर्वानी अंजनेरी सह जवळपासचा परिसर पिंजून काढला आहे. यानंतर अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा दावाही पुराव्यासहित सिद्ध करणार असल्याचे सांगितले आहे. 


दरम्यान आज सकाळी नाशिकचे साधु महंत, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी एकत्र येत नाशिक त्र्यंबक रस्त्यावर रास्ता रोको केला आहे. अंजनेरी फाट्यावर नाशिक मधील साधू महंत आणि एकत्र आले असून त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरी मध्येच झाल्याचा दावा नाशिकमधील गावकरी आणि साधू महंत करीत आहेत. त्यामुळे हा वाद पेटला असल्याचे चित्र या आंदोलनावरून दिसून येत आहे.                                                                                                                                                                                अंजनेरी हे हनुमान जन्मस्थान - भुजबळ 
हनुमान जन्म कुठे झाला याने आता काय फरक पडणार आहे, राज्यात प्रत्येक गावात हनुमानाची पूजा होते. प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आहे, प्रत्येक ठिकाणी हनुमानाची पूजा, मग कोणी कितीही म्हटले तरी पूजा करणे थांबणार आहे का? मंदिर मशिद वाद वेगळा? आता काय शिक्कामोर्तब होणार का? अंजनेरी हे हनुमान जन्मस्थान आहे म्हणून त्यामुळे हनुमान जन्म कुठे झाला? याने आता काय फरक पडणार? सगळे वाद निरर्थक असून शेतकरी, महागाई असे अनेक प्रश्न राज्यात आहेत. कोणी कुठून ही महाराज आले तरी काय? आता राजकारणातच महाराज आहेत, अंगावर काही टाकून घेतात, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. 


उद्या शास्रार्थ सभा 
दरम्यान हनुमान जन्मस्थळाचा वादावरून अंजनेरीचे (Anjneri) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविदानंद महाराज हे त्र्यंबकेश्वरात ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दावा केल्यानंतर हा वाद सुरु झाला. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर-नाशिक (Trimbaekshwer) येथील साधू महंतांनी याबाबत बैठक घेतली असून उद्या नाशिकरोड येथे याबाबत महाचर्चा होणार आहे. त्यामुळे नाशिकचे साधू महंत अंजनेरी जन्मस्थळाबाबत काय भूमिका मांडतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.