Nashik News : नाशिक (Nashik) शहरात धो धो पावसांमुळे रस्त्याची चाळण झाल्याचे समोर आले. अनेक भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त (Nashik NMC) आक्रमक झाले असून येत्या आठ दिवसांत खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांत खड्डेमुक्त रस्ते पाहायला मिळणार अशी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. 


मागील दहा दिवसांत नाशिक शहरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने नाशिककरांना सुखद धक्का दिला. गोदावरी नदी (Godavari River) देखील दुथडी भरून वाहू लागली. मात्र या सर्वांत दरवर्षीं होणारी रस्त्यांची चाळण यंदाही झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील महत्वाचे भाग असलेल्या नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सीबीएस परिसर, नाशिक-पुणे रोड,  उंटवाडी, पंचवटी डेपो, सातपूर आदी विभागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरताच खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती सुरू करावी, अशा सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.


गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश आयुक्त पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरातील रस्त्यांचे कंत्राटदार, ज्या रस्त्यांचे दायित्व कालावधी अद्याप लागू आहे, ते रस्ते दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदार जबाबदार असतील. उर्वरीत रस्ते मनपाने करायची आहेत. रस्ता तयार केल्यानंतर त्याचे दायित्व कालावधी तीन वर्षांचा आहे. याचा अर्थ, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांना तीन वर्षे रस्त्यांची देखभाल करावी लागेल. ज्या रस्त्यांसाठी दोष दायित्व कालावधी संपला आहे, त्यांची दुरुस्ती मनपाद्वारे केली जाणार आहे. 


तीस कोटींची तरतूद 
दरम्यान नाशिक शहरात आठवड्यभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्ते नॉट ओके असं म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. नाशिक महापालिकेने पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी ३० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने भर पावसात खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे. सुरुवातीला खड्डे ग्रॅन्युलर सब-बेसने भरतील. पावसाळा संपला की आम्ही डांबरीकरणाचे काम सुरू करू ,असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.